बंगळुरूपुढे आता किंग्स इलेव्हनचे आव्हान
By Admin | Updated: April 10, 2017 01:23 IST2017-04-10T01:23:41+5:302017-04-10T01:23:41+5:30
स्टार खेळाडूंविना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदविल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघापुढे

बंगळुरूपुढे आता किंग्स इलेव्हनचे आव्हान
इंदूर : स्टार खेळाडूंविना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदविल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघापुढे आज सोमवारी यंदाच्या पर्वातील तिसऱ्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान राहील.
आरसीबीने आपल्या मोहिमेची सुरुवात स्टार फलंदाज विराट कोहली व महत्त्वाचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स यांच्याविना केली होती. आरसीबी संघाला गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला. भारतीय फलंदाज लोकेश राहुलही दुखापतीमुळे या स्पर्धेतून ‘आऊट’ झाला आहे. प्रतिभावान सर्फराज खानच्या यंदाच्या मोसमातील सहभागाबाबत साशंकता आहे. सराव सत्रादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. कोहली सोमवारच्या लढतीत खेळणार नसल्याचे निश्चित आहे. कारण २ एप्रिलला बीसीसीआयसोबत चर्चा झाल्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कुठलेही अधिकृत वृत्त आलेले नाही. त्याची फिटनेस चाचणी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे शनिवारी स्पष्ट करण्यात आले होते. डिव्हिलियर्सच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे. त्याच्या अनुपस्थितीत वॉटसन प्रभारी कर्णधाराची भूमिका बजावत आहे.
मॅक्सवेल सातत्य राखण्यास उत्सुक
किंग्स इलेव्हन पंजाब संघाने चांगली सुरुवात करताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा ६ गडी राखून पराभव केला. आॅस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चमकदार खेळी करताना २० चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने पुण्याविरुद्धच्या लढतीत संघाचे प्रथमच नेतृत्व केले होते. मॅक्सवेल कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. पंजाब संघ जवळजवळ १० दिवसांपासून होळकर स्टेडियममध्ये सराव करीत आहे. त्यांना तेथील परिस्थितीची चांगली माहिती आहे. संघाचा सिनिअर फलंदाज मुरली विजय दुखापतग्रस्त असल्यामुळे पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे.