‘चेपॉक’वर चेन्नईच किंग
By Admin | Updated: April 29, 2015 01:33 IST2015-04-29T01:33:29+5:302015-04-29T01:33:29+5:30
धोनीच्या धुरंधरांनी धमाल करत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या दोन धावांनी बाजी मारली.

‘चेपॉक’वर चेन्नईच किंग
कोलकात्याकडून हिसकावला सामना : २ धावांनी निसटता विजय
चेन्नई : धोनीच्या धुरंधरांनी धमाल करत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या दोन धावांनी बाजी मारली. १३५ धावांचे सोपे वाटणारे आव्हान कोलकात्यासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरने ९ बाद १३२ धावा अशी मजल मारली. शिस्तबद्ध गोलंदाजी व धोनीची ‘कॅप्टन्सी’ यामुळे चेपॉक मैदानावर पुन्हा एकदा चेन्नईच ‘किंग’ ठरला. ब्राव्होने सर्वाधिक ३ बळी घेतले.
१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार गौतम गंभीर पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर परतला. त्यानंतर मनीष पांडे आणि रॉबिन उथप्पा या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. उथप्पाने १७ चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मनीष पांडेने १५ धावा केल्या. पांडे बाद झाला त्या वेळी कोलकाता संघ ३ बाद ६१ अशा स्थितीत होता. कोलकाता हे लक्ष्य सहज गाठेल असे दिसत होते. मात्र, सूर्यकुमार यादव (१६), यूसफ पठाण (१३) हे टप्प्याटप्प्याने बाद झाले.त्यानंतर ब्राव्होने कोलकात्याची चांगलीच गोची केली. त्याने कमिन्स (०) आणि पियूष चावला (०) यांना एकाच षटकात तंबूत पाठवले. एका बाजूने रेयान डोएशे फटकेबाजी करीत होता. तर दुसऱ्या बाजूने धोनीचे गोलंदाज फलंदाजांना तंबूत पाठवत होते. त्यामुळे कोलकात्याची स्थिती ‘गंभीर’ झाली. डोएशने (३८) अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ३, आश्विनने २ तर पांडे, नेहरा आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, कोलकाताने चेन्नईला ६ बाद १३४ धावांवर रोखले. चेन्नईकडून ड्यु प्लेसिसने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. गौतमचा हा निर्णय ‘गंभीर’च होता हे गोलंदाजांनी अखेर सिद्ध केले. पहिल्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी करीत चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, पियूषच्या फिरकीने ब्रॅँडन मॅक्युलमला चकवले. ब्रॅँडनने १४ चेंडूंत १९ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर यूसफ पठाणच्या ‘सुपर’ थ्रोने ड्वेन स्मिथ धक्कादायकरीत्या धावबाद झाला. स्मिथने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार ठोकला.
यानंतर सुरेश रैना आणि प्लेसिसने प्रयत्न केले. मात्र, रैना १७ धावांसाठी २१ चेंडू खेळला. अखेर रसेलच्या चेंडूवर रैना बाद झाल्यावर चेन्नई ९.३ षटकांत ३ बाद ६७ अशा स्थितित होता. धोनी (३) पाठोपाठ ब्राव्हो (५), रवींद्र जडेजा (१५) हे स्वस्तात परतले. त्यामुळे चेन्नई १९ व्या षटकांत ६ बाद १२४ अशा स्थितीत सापडली. एका बाजून ड्यु प्लेसिसने २९ चेंडूंत २९ धावा काढल्याने चेन्नईला समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (वृत्तसंस्था)
गोलंदाजी : कमीन्स ४-०-२५-०; यादव ४-०-३६-०; चावला ४-०-२६-२; हॉग ४-०-१८-१; रसेल ४-०-२६-२. कोलकाता: उथप्पा झे. मॅक्क्युलम गो. अश्विन ३९, गंभीर झे. धोनी गो. पांड्ये ०, मनिष झे. ब्रावो गो. अश्विन १५, यादव झे. ब्रावो. गो. शर्मा १६, पठाण त्रि. गो. ब्रावो १३, डोइशेट नाबाद ३८, रसेल धावबाद (जडेजा/धोनी) ४, कमीन्स झे. जडेजा गो. ब्रावो ०, चावला झे. धोनी गो. ब्रावो ०, यादव त्रि. गो. नेहरा ०, हॉग नाबाद २. अवांतर - ५. एकूण: २० षटकांत ९ बाद १३२ धावा.
गोलंदाजी : पांड्ये २-०-१८-१; नेहरा ४-०-३८-१; शर्मा ३-०-२४-१; अश्विन २-०-५-२; जडेजा ३-०-११-०; रैना ३-०-१२-०; ब्रावो ३-०-२२-३.
चेन्नई : स्मिथ धावबाद (पठाण) २५, मॅक्क्युलम पायचीत गो. चावला १९, रैना झे. उथप्पा गो. रसेल १७, प्लेसिस नाबाद २९, धोनी झे. उथप्पा गो. रसेल ३, ब्रावो झे. सुर्यकुमार गो. चावला ५, जडेजा त्रि. गो. हॉग १५, अश्विन नाबाद ९. अवांतर - १२. एकूण: २० षटकांत ६ बाद १३४ धावा