किरेनची ऐतिहासिक कामगिरी
By Admin | Updated: October 4, 2016 03:21 IST2016-10-04T03:21:43+5:302016-10-04T03:21:43+5:30
नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने १ आॅक्टोबला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची

किरेनची ऐतिहासिक कामगिरी
नागपूर : नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने १ आॅक्टोबला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची ‘स्पार्टाथॅलोन’ यशस्वीपणे पूर्ण केली. या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ग्रीसच्या अथेन्स आणि स्पार्ट यांच्यादरम्यान करण्यात आले होते. अशी कामगिरी करणारा २३ वर्षीय किरेन भारताचा पहिला स्पर्धक ठरला. त्याने हे अंतर ३३ तास ३ मिनिट २५ सेकंद वेळेत पूर्ण केले. या शर्यतीदरम्यान त्याने १०० मैल अंतर १८.३७ तासांमध्ये पूर्ण करण्याचा पराक्रम करताना १५९.५ किलोमीटर अंतरावर असलेला ४७वा चेक पॉर्इंट गाठला.
सहभागी ३७० स्पर्धकांमध्ये त्याला ८६व्या स्थानावर समाधान मानावे लागले. शर्यत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांसाठी पुरस्कार नव्हता. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा ओलिव्हच्या पानाचा मुकुट देऊन गौरव करण्यात आला आणि पुरस्कार म्हणून इरोटस नदीचे जल प्रदान करण्यात आले.
२०१२पासून किरेन या शर्यतीसाठी तयारी करीत होता. या शर्यतीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ठरला. या शर्यतीपूर्वी त्याला ६० किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा ‘अल्ट्रा मॅराथॉनपटू’ म्हणून गौरविण्यात आले होते. गेल्या वर्षी त्याने १०० मैलांची सालोमन भट्टी लेक्स अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून सर्वांत वेगवान भारतीय अॅथलिटचा मान मिळवला होता. गेल्या वर्षी त्याने लद्दाखची २२२ किलोमीटर अंतराची अल्ट्रा शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय अॅथलिट होण्याचा मान मिळवला होता.
शर्यत पूर्ण केल्यानंतर मीडियाश्ी बोलताना किरेन म्हणाला, ‘‘अनेक प्रायोजक व समर्थकांच्या पाठिंब्यामुळे मला ही अनोखी शर्यत पूर्ण करण्यात यश आले. भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी मला शक्तिवर्धक
आहार व आर्थिक साह्याची गरज आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)