किदांबी श्रीकांतने रचला इतिहास
By Admin | Updated: March 16, 2015 02:23 IST2015-03-16T02:23:13+5:302015-03-16T02:23:13+5:30
भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत याने आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विक्टर एलेक्सन यास पराभूत करीत स्विस ओपन ग्रांप्री गोल्ड किताब

किदांबी श्रीकांतने रचला इतिहास
बासेल : भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत याने आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विक्टर एलेक्सन यास पराभूत करीत स्विस ओपन ग्रांप्री गोल्ड किताब आपले नावे केला. हा किताब जिंकणारा तो प्रथम भारतीय खेळाडू ठरला आहे. जगातील चौथ्या नंबरचा खेळाडू श्रीकांत याने सहाव्या क्रमांकावरील डेन्मार्कच्या एलेक्सनचा २१-१५, १२-२१, २१-१४ अशा सेटने पराभव केला. हा सामना ४७ मिनिटे चालला. या विजयाने श्रीकांतला एक लाख वीस हजार डॉलरचे पारितोषिक मिळाले.
चीन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर २०१४च्या फायनलमध्ये पाच वेळेस विश्व आणि दोनवेळा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लिन डैन याचा खळबळजनक पराभव करणाऱ्या श्रीकांतने दुसरा सेट गमविल्यानंतर पुनरागमन करून विजय मिळविला.
स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी अत्यंत सतर्कतेने खेळ करण्यास सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ दोघांची ८-८ असेच बरोबरी असताना श्रीकांतने जोरदार आक्रमक करीत पहिला सेट आपल्या नावे केला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये एलेक्सनने श्रीकांतला कसलीच संधी न देता सुरुवातीपासून आगेकूच केली. अखेर त्याने दुसरा सेट २१-१२ने आपल्या नावे मिळविला.
तिसरा सेट अतिशय रंगतदार झाला. सुरुवातीपासून दोघांचा ४-४, ९-९, १३-१३ असा बरोबरीवर खेळ सुरू होता. यानंतर श्रीकांतने सलग तीन अंक मिळवत चढाई केली. त्यानंतर एलेक्सनला केवळ एकच अंक मिळविता आला. त्यानंतर श्रीकांतने सलग तीन पाच अंक मिळवित सेट आपल्या नावे केला. (वृत्तसंस्था)