नवी दिल्ली : यजमान भारतीय महिला संघाने पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारताना अ गटात इराण संघाला १००- १६ असे ८४ गुणांनी सहजपणे लोळवले. सलग दुसरा विजय मिळवताना भारतीयांनीइराणला त्यांचा खेळ करण्याची संधीच दिली नाही. मोनिकाने तब्बल ६.०८ मिनिटांचे संरक्षण करत इराणला दमवले.
दुसरीकडे, भारतीय पुरुषांनीही दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मध्यंतरालाच ५२-१० अशी एकतर्फी आघाडी घेत भारतीय महिलांनी निकाल स्पष्ट केला. इराणच्या खेळाडूंचा भारताच्या वेगापुढे काहीच निभाव लागला नाही. पहिल्या डावात भारताने इराणच्या ८ फळी बाद करत वर्चस्व राखले. इराणच्या कोणत्याच फळीला ३०-४० सेकंदाहून अधिक वेळ संरक्षण करता आले नाही. यानंतर भारतीयांनी भक्कम संरक्षण करताना ड्रीम रनचे २ गुण मिळवत इराणच्या खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण केले.
जबरदस्त संरक्षण...
दुसऱ्या डावात इराणने संरक्षणामध्ये काहीशी सुधारणा केली; परंतु तरीही भारतीयांनी ४१ गुण घेत पूर्ण पकड मिळवली. भारतीयांनी संरक्षणात जबरदस्त कामगिरी करत इराणच्या आक्रमकांना दमवले. एकट्या मोनिकाने ६.०८ मिनिटांचे संरक्षण करत इराणचा पराभव स्पष्ट केला. नसरीन शेख, कर्णधार प्रियांका इंगळे, मिनू, अश्विनी शिंदे, वैष्णवी पवार, मगई माझी, निर्मला भाटी आणि चैत्रा आर. यांनीही भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
पेरूचा पाडला फडशा
भारतीय पुरुषांनी सलग तिसरा विजय मिळवताना पेरू संघाचा ७०- ३८ असा फडशा पाडला. मध्यंतरालाच ३६-१६ अशी आघाडी घेत भारतीयांनी विजय स्पष्ट केला. या दमदार विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. कर्णधार प्रतीक वाईकर, अनिकेत पोटे, सचिन चिंगारे, सुयश गरगाटे यांनी शानदार खेळ केला. अनिकेतने अप्रतिम सूर मारत पेरूच्या संरक्षकांना सहजपणे बाद केले. त्याला इतर आक्रमकांचीही चांगली साथ लाभली.