Kho kho World Cup 2025 India | नवी दिल्ली: बलाढ्य भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी गुरुवारी आपापल्या अखेरच्या साखळी सामन्यांत अपेक्षित बाजी मारताना विश्वचषक खो-खो स्पर्धेत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या महिलांनी मलेशियाचा १००-२० असा चुराडा केला. यासह महिलांनी सलग तिसऱ्या सामन्यात १०० गुणांची नोंद केली. दुसरीकडे, पुरुषांनी सलग चौथा विजय मिळवत भूतानचे कडवे आव्हान ७१-३४ असे परतावत दिमाखात आगेकूच केली.
भारतीय पुरुषांनी अप्रतिम सूर मारत भूतानच्या संरक्षकांना बाद करण्याचा सपाटा लावला. मध्यंतराला ३२-१८ अशी मोठी आघाडी घेत यजमानांनी आपले वर्चस्व राखले. भारतीयांनी पहिल्या डावात भूतानच्या संरक्षकांच्या ५ फळी बाद केले. यानंतर कर्णधार प्रतीक वाईकर, सुब्रमनी व्ही. यांनी शानदार संरक्षण केले. करत भूतानच्या खेळाडूंचा घाम काढला.
महिलांची शानदार ड्रीम रन
भारतीय महिलांनी पहिल्या डावात ६, तर दुसऱ्या डावात ४ ड्रीम रन गुण मिळवत जबरदस्त कामगिरी केली. अत्यंत एकतफीं झालेल्या या सामन्यात मध्यंतरालाच ४४-०६ अशी आघाडी घेत मलेशियाचा पराभव स्पष्ट केला. भिलार ओपिनाबेन, मोनिका यांनी भक्कम बचाव करत भारताला पूर्ण पकड मिळवून दिली. मोनिकाने दमदार आक्रमणासह शानदार अष्टपैलू खेळ केला. भारतीयांच्या वेगवान खेळापुढे मलेशियाला आव्हानच निर्माण करता आले नाही.
--------------
५३ गुणांचे दिले आव्हान
दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भारतीयांनी वेगवान आक्रमण करताना ६ फळी गारद करत भूतानला ५३ गुणांचे कठीण आव्हान दिले. परंतु, सुयश गारगटे (३:२४) आणि गौथम एम. के. (२:१८) यांच्या जबरदस्त संरक्षणाच्या जोरावर भारताने एक ड्रीम रन गुण मिळवत भूतानला पुनरागमनाची संधीच दिली नाही.