पुणे मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व
By Admin | Updated: December 8, 2014 00:59 IST2014-12-08T00:59:07+5:302014-12-08T00:59:07+5:30
देशभरातील सुमारे २५ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या २९व्या पुणे मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले.

पुणे मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व
पुणे : देशभरातील सुमारे २५ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या २९व्या पुणे मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले. सुमारे ४२ किलोमीटर अंतराची मुख्य शर्यत केनियाचा अमोस मैंडीने २ तास १८.३६ मिनिट वेळेत जिंकली. केनियाच्याच नॅन्सी वाम्बुआ हिने महिला अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास ११.५५ मिनिटांत अव्वल क्रमांक पटकावला. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्याच डॅनियल मुटेटी याने बाजी मारली. याबरोबरच केनियाच्या खेळाडूंनी मागील वर्षी इथिओपियाच्या खेळाडंूकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.
अतिशय रंगतदार झालेल्या मुख्य शर्यतीत अमोसने इथिओपियाच्या रेगासा बेजिगा (२:१८:३७) आणि टेरेफी यदेतातिमेसेजेन (२:१८:३८) यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लावले. महिलांमध्ये नॅन्सीनंतर केनियाचीच हेलेन मुस्योका (१:१२:२३) उपविजेती ठरली. इथिओपियाची टिन्बिट लेव्देगेब्रिएल (१:१२:३३) तिसरी आली. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये पहिले २ क्रमांक केनियाच्या खेळाडूंनी पटकावले. मुटेटी (१:०२:०४) आणि रॉबर्ट एमबिथी (१:०२:०५) अनुक्रमे पहिले आणि दुसरे आले. इथिओपियाचा असरत कासिक (१:०३:०२) तिसरा आला. गतवर्षी या तिन्ही शर्यतींमध्ये इथिओपियाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला होता.
देशातील मॅरेथॉनची जननी असलेल्या पुणे मॅरेथॉनला यावेळी सकाळी पावणेसहा वाजता प्रारंभ झाला. सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा विचार करता यावेळी खेळाडूंकडून विक्रमी वेळ अपेक्षित होती. मात्र, याबाबत मॅरेथॉनप्रेमींची निराशा झाली. पुनावाला ग्रुप आॅफ कंपनीजचे संचालक योहान पुनावाला यांनी फ्लॅग आॅफ करून शर्यतीचे उद्घाटन केले. (क्रीडा प्रतिनिधी)