करुण नायरच्या पदार्पणाची शक्यता!
By Admin | Updated: November 17, 2016 02:03 IST2016-11-17T02:03:58+5:302016-11-17T02:03:58+5:30
राजकोटच्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताला चांगलाच धडा शिकविला. कर्णधार कूकच्या साहसी निर्णयाचा देखील परिचय झाला

करुण नायरच्या पदार्पणाची शक्यता!
सुनील गावसकर लिहितो-
राजकोटच्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारताला चांगलाच धडा शिकविला. कर्णधार कूकच्या साहसी निर्णयाचा देखील परिचय झाला. त्याने संघाला सावरल्यानंतर भारताला विजयासाठी २४० धावांचे आव्हान देऊ शकला असता पण असे केल्यामुळे टीकाकारांना उत्तर देणे त्याच्यासाठी जड गेले असते. इंग्लंडच्या फलंदाजांनी दोन्ही डावांत संयम आणि आक्रमकतेचा परिचय देत भारतीय फिरकीपटूंना हतबल केले.
तुम्ही समजता तसेच आम्ही नांगी टाकणारे नाही, असा स्पष्ट संदेश यातून बाहेर आला आहे. राजकोटची खेळपट्टी देखील फिरकीला मुळीच उपयुक्त वाटली नाही. ती फलंदाजांना पूरक होती. दुसऱ्या डावात काही चेंडू वळण घेऊ लागले तेव्हा देखील पाहुण्या फलंदाजांनी धैर्याने तोंड देत संकटाचा सामना केला. विकेट मिळतील अशा लाईन आणि लेंग्थने चेंडू टाकणे भारतीय फिरकीपटूंना राजकोटमध्ये जमलेच नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवशी जडेजाला थोडीफार साथ लाभली, पण तो बळी घेण्यासाठी नव्हे तर षटकार लागणार नाहीत याची काळजी घेत गोलंदाजी करीत असल्याचे जाणवले. पण त्याने गुड लेंग्थवर आखूड टप्याचे चेंडू टाकायला हवे होते.
अशावेळी फलंदाज खेळण्यासाठी बाहेर येतो. चेंडू टोलविण्यात तो अपयशी ठरला तर बाद होऊ शकतो. या मालिकेआधी इंग्लंडचे फलंदाज बांगला देशात खेळले नसते तर कदाचित अडचणीत येऊ शकले असते. या दौऱ्यात त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळेच ते पुढे येऊनही खेळतात. क्रिझ न सोडता देखील चेंडू टोलविण्याची कला देखील आत्मसात केलेली दिसते. भारतीय फलंदाजांनी देखील राजकोटमध्ये खेळपट्टीचा लाभ घेत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग केला. पण दुसऱ्या डावात इंग्लिश फिरकीपुढे त्यांची तारांबळ उडालीच! आता दुसऱ्या सामन्यात भारताची चिंता वाढली आहे. नाणेफेकीचा काल विरोधात गेला आणि सुरुवातीला फलंदाजीची संधी मिळाली नाही तर चौथ्या डावात पाठलाग करताना संकट ओढविण्याचा धोका आहे. त्यादृष्टीने अंतिम एकादशची निवड करावी लागेल. करुण नायर हा सहावा फलंदाज या नात्याने पदार्पण करु शकतो. याच खेळपट्टीवर काही दिवसांआधी वन डेत पाच गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला बाहेर ठेवणे हा त्याच्यावर अन्याय होईल. लेगस्पिनरला आत्मीयतेने हाताळायला हवे, असे शेन वॉर्न नेहमी म्हणायचा. पण काही आधुनिक कर्णधार लेगस्पिनरबाबत जुगार खेळतात. लेगस्पिनर धावांबाबत खर्चिक ठरतात असे यामागे कारण देतात. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तीनपैकी दोन फलंदाजांना मिश्रानेच बाद केले. मला गोलंदाजीची पुरेपूर संधी दिल्यास फलंदाजांना अडचणीत आणू शकतो, असे त्याने संकेत दिले आहेत. इंग्लंड संघात वेगवान अॅण्डरसन पुनरागमन करू शकतो. विश्व क्रिकेटमध्ये चेंडू दोन्ही बाजूने वळविणारा तो एकमेव गोलंदाज आहे. तो खेळल्यास भारतीय फलंदाजांची विशेषत: सलामी जोडीची कसोटी असेल. राजकोटमध्ये उभय संघांनी परस्परांना ओळखले त्यामुळे खरी परीक्षा सुरू होईल ती आजपासूनच!