नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने प्रशिक्षक म्हणून निराश केल्याचा खुलासा सचिन तेंडुलकरने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रातून केला आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कपिलमुळे निराश झालो होतो. कपिलने प्रशिक्षक म्हणून रणनीती आखताना मला समाविष्ट केले नव्हते. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, असे मत तेंडुलकरने पुस्तकात व्यक्त केले आहे.त्याने लिहिले की, मी दुसऱ्यांदा कर्णधार बनलो, तेव्हा कपिल प्रशिक्षक होते. ते भारताकडून सर्वोत्तम खेळ खेळणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आणि जगातील सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक असलेल्या कपिल यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या. प्रशिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते, असे मी नेहमी म्हणतो. संघाला मजबूत बनविण्यासाठी त्यांची रणनीती महत्त्वाची ठरते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मला मदत करण्यासाठी कपिलहून दुसरे कुणी असूच शकत नव्हते, परंतु त्यांच्या विचारांना सीमा होती आणि त्यामुळे सर्व जबाबदारी कर्णधारावर आली. कर्णधार म्हणून अनेक निर्णय चुकीचे ठरल्याने सचिन निराश झाला होता. १९९७च्या शारजा मालिकेत त्याने रॉबिन सिंगला बढती देत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते, परंतु त्याचा हा प्रयोग फसला आणि प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर सडकून टीका केली. याबाबत तेंडुलकरने लिहिले, की पाकिस्तानविरुद्धच्या १४ डिसेंबरचा सामना मला नेहमी आठवतो.