कामिनी-पूनम जोडी नंबर वन !
By Admin | Updated: November 18, 2014 01:02 IST2014-11-18T01:02:31+5:302014-11-18T01:02:31+5:30
तिरुष कामिनी आणि पूनम राऊत या भारतीय महिला क्रिकेटपटू आज, सोमवारी जोडी नंबर वन बनल्या.

कामिनी-पूनम जोडी नंबर वन !
म्हैसूर : तिरुष कामिनी आणि पूनम राऊत या भारतीय महिला क्रिकेटपटू आज, सोमवारी जोडी नंबर वन बनल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी रचली. त्यानंतर आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवित भारताने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
कामिनी (१९२) अवघ्या आठ धावांनी द्विशतकांपासून वंचित राहिली. तिने पूनम राऊत (१३०) सोबत २७५ धावांची भागीदारी केली, जो महिला क्रिकेटमध्ये एक विक्रम आहे. या दोघींच्या बहारदार खेळीमुळे भारताने आपला पहिला डाव ४०० धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद ८५ धावा केल्या होत्या. ते अजून ३१५ धावांनी पिछाडीवर आहेत.
त्याआधी, भारतीय संघाने सकाळी १ बाद २११ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दोघींनीही शतक गाठले होते. शानदार फटकेबाजी करीत त्यांनी महिला क्रिकेटमधील दुसऱ्या गड्यासाठी असलेला ७९ वर्षांआधीचा विक्रम मोडीस काढला. त्यांनी इंग्लंडच्या बैंटी स्नोबाल आणि मोली हाईड यांचा न्यूझीलंडविरुद्धचा १९३५ मध्ये नोंदविलेला २३५ धावांचा विक्रम मोडला.
राऊत बाद झाल्याने ही जोडी फुटली. तिला डेन वान निकर्कने यष्टिचित केले. राऊतने ३५५ चेंडूंचा सामना करीत १८ चौकार ठोकले. कर्णधार मिताली राजने ७ चौकारांच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली. मात्र, सर्वांचे लक्ष कामिनीवर होते. मितालीनंतर द्विशतक करण्याची तिची संधी थोडक्यात हुकली.तिने ४३० चेंडूंचा सामना करीत २४ चौकार आणि एक षटकार लगावला. (वृत्तसंस्था)