‘कबड्डीचे गोल्डन डेज सुरू झालेत’
By Admin | Updated: July 4, 2015 02:01 IST2015-07-04T02:01:21+5:302015-07-04T02:01:21+5:30
प्रो - कबड्डीमुळे आम्हाला वेगळी ओळख मिळाली आहे. आम्ही १०-१२ वर्षांपासून कबड्डी खेळत आहोत. परंतु इतक्या वर्षांत जे आम्हाला मिळाले नाही ते एका वर्षात प्रो कबड्डीच्या माध्यमातून

‘कबड्डीचे गोल्डन डेज सुरू झालेत’
रोहित नाईक, मुंबई
प्रो - कबड्डीमुळे आम्हाला वेगळी ओळख मिळाली आहे. आम्ही १०-१२ वर्षांपासून कबड्डी खेळत आहोत. परंतु इतक्या वर्षांत जे आम्हाला मिळाले नाही ते एका वर्षात प्रो कबड्डीच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. आज कबड्डी घराघरांत पोहचला आहे. त्यामुळेच निश्चितच आता कबड्डीचे गोल्डन डेज सुरु झालेत, असे प्रो कबड्डीतील सर्वात महागडा खेळाडू आणि पटणा पायरेट्स संघाचा कर्णधार राकेश कुमार याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रो कबड्डीचे दुसऱ्या सत्राला १८ जुलैपासून मुंबईत सुरुवात होणार आहे.
गतस्पर्धेविषयी राकेश म्हणाला की, पहिला सीजन धमाकेदार झाला. निर्णायक क्षणी झालेल्या चुकांमुळे आम्हाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. यावेळी त्या चुका कटाक्षाने टाळू. स्पर्धेत सर्वच संघ तगडे असून कोणालाही कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. शिवाय पहिले आमच्या संघात १४ खेळाडूंचा समावेश होता आता ही संख्या २५ वर गेली असल्याने आमच्याकडे अधिक चांगले पर्याय असल्याने आम्ही लक्षवेधी कामगिरी करु, असा विश्वासही राकेशने व्यक्त केला.
प्रो कबड्डीनंतर खेळाडूंच्या आयुष्यात अनेक बदल झाले. याविषयी राकेश म्हणतो, ही स्पर्धा आमच्यासाठी जॅकपॉट सारखी होती. आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम झालोच, त्याचबरोबर ग्लॅमरही मिळाले. हे सर्व स्वप्नवत आहे. आज प्रत्येक घराघरामध्ये खेळ पोहचला आहेच, परंतु आमचीही एक ओळख निर्माण झाली. फक्त माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्या खेळाडूंचे फॅन फॉलोअर्स तयार झाले आहेत.