कबड्डीतला महागडा ‘चिल्लर’
By Admin | Updated: May 14, 2016 01:55 IST2016-05-14T01:55:17+5:302016-05-14T01:55:17+5:30
यू मुंबाकडून आपली चमक दाखविलेल्या या स्टार खेळाडूला बंगळुरु बुल्स संघाने तब्बल ५३ लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले.

कबड्डीतला महागडा ‘चिल्लर’
प्रो-कबड्डी लिलाव : मोहितवर लागली ५३ लाखांची बोली, अत्राचली बंगालकडे
मुंबई : प्रो-कबड्डीच्या चौथ्या सत्रासाठी शुक्रवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये स्टार डिफेंडर मोहित चिल्लर याने जबरदस्त वर्चस्व राखले. यू मुंबाकडून आपली चमक दाखविलेल्या या स्टार खेळाडूला बंगळुरु बुल्स संघाने तब्बल ५३ लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले. त्याचवेळी गतविजेत्या पटना पायरेट्सचा अनुभवी संदीप नरवालला तेलगू टायटन्सने ४५.५ लाखांच्या किमतीत आपल्या चमूत घेतले.
मुंबईतील एका पंचताराकित हॉटेलमध्ये झालेल्या या लिलावात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा विचार करता नितीन मदने २५ लाखांसह सर्वाधिक महागडा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशाल मानेला व बाजीराव होगडे यांनीही अनुक्रमे २४ व २० लाखांची बोली लागल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या या तिन्ही महागड्या खेळाडूंना बंगाल वॉरियर्सने आपल्या संघात घेतले.
या लिलावाचा मोठा फटका बसला तो बलाढ्य यू मुंबा संघाला. यू मुंबाला चार प्रमुख डिफेंडर विशाल माने, मोहित चिल्लर, सुरेंदर नाडा आणि फझेल अत्राचली यांना गमवावे लागले. दरम्यान, या चौघांना आपल्या संघात घेण्यासाठी यू मुंबाने जोरदार प्रयत्न केले; परंतु बोली वाढत गेल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. मोहितसह सुरेंदर नाडालाही बंगळुरुने घेताना आपली बचावफळी भक्कम केली. त्याचवेळी जीवा कुमार आणि राकेश कुमार या अनुभवी खेळाडूंना कायम राखण्यात यू मुंबाला यश आले. त्यामुळे या दोघांसह कर्णधार अनुप कुमार व रिशांक देवाडिगा यांच्यावर यू मुंबाची मदार असेल.
पहिल्या सत्रात मिळालेल्या किमतीच्या नऊपट अधिक रक्कम यंदा सर्वाधिक महागडा ठरलेल्या मोहितला मिळाली. प्रत्येक संघाला केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा मिळाली होती. (क्रीडा प्रतिनिधी)
या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या आयुष्यात खूप मोठा फरक आलेला आहे. पहिल्या सत्राच्या तुलनेत यंदाच्या लिलावातून त्यांना मिळत असलेली मोठी किंमत पाहून मी खूश आहे. आम्ही चांगल्या खेळाडूंची फळी तयार करण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद आहे.
- अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर्स - संघमालक
या लिलावातून आम्ही समतोल संघ साधला आहे. खेळाडूंमधील ताळमेळ, नेतृत्त्वक्षमता आणि आक्रमण व बचाव यांच्यात समतोल साधणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या लिलावातून आम्ही आमचे काही खेळाडू गमावले असले तरी काही चांगले खेळाडू संघात घेतलेही आहेत.
- रॉनी स्क्रुवाला,
यू मुंबा - संघमालकप्रो कबड्डी लीगची लोकप्रियता वाढली आहे. आतापर्यंत एकूण ९६ देशांमध्येही स्पर्धेचे प्रसारण होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानही आपल्या खेळाडूंना खेळविण्यास उत्सुक आहे. परंतु, सध्या पाकिस्तानच्या खेळाडूंविरोधात असलेले वातावरण पाहता त्यांच्या सहभागाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, पाकिस्तानमध्ये या लीगची लोकप्रियता तुफान आहे. त्यांच्याकडे सर्कल कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धा होते, मात्र तरीही प्रो कबड्डीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. प्रो कबड्डीचे आतापर्यंत केवळ तीन सत्र झालेले आहेत आणि पुढे नक्कीच चित्र बदलेल याचा विश्वास आहे.
- चारू शर्मा, मशाल स्पोर्टस्, संचालक
> सर्वाधिक बोली लागलेले मुख्य खेळाडू
खेळाडूनवीन संघजुना संघ किंमत
१. मोहित चिल्लरबंगळुरु बुल्सयू मुंबा५३ लाख
२. संदीप नरवालतेलगू टायटन्स पटना पायरेट्स४५.५ लाख
३. जीवा कुमारयू मुंबायू मुंबा४० लाख
४. फझल अत्राचलीपटना पायरेट्सयू मुंबा३८ लाख
५. जसमेर सिंग गुलियातेलगू टायटन्सपुणेरी पलटन ३५.५ लाख
६. शब्बीर बापू पटना पायरेट्सयू मुंबा३२.२ लाख
७. कुलदीप सिंगपटना पायरेट्सजयपूर पिंक पँथर्स ३०.४ लाख
८. सुरेंदर नाडाबंगळुरु बुल्सयू मुंबा३० लाख
९. धरमराज चेरालथनपटना पायरेट्सतेलगू टायटन्स२९ लाख
१०. राकेश कुमारयू मुंबा यू मुंबा २६ लाख
११. नितीन मदने बंगाल वॉरियर्स बंगाल वॉरियस२५ लाख
१२. विशाल माने बंगाल वॉरियर्स यू मुंबा२४ लाख
१३. बाजीराव होडगे पटना पायरेट्सबंगाल वॉरियर्स २० लाख
१४. अजय ठाकूरपुणेरी पलटन पुणेरी पलटन१९ लाख