जामठ्यात क्रिकेटची माती !

By Admin | Updated: November 27, 2015 00:44 IST2015-11-27T00:44:29+5:302015-11-27T00:44:29+5:30

भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला

Jumath cricket soil! | जामठ्यात क्रिकेटची माती !

जामठ्यात क्रिकेटची माती !

किशोर बागडे , नागपूर
भारत-द. आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी खेळपट्टीच्या खराब स्वरूपामुळे चर्चेत आली आहे. दुसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल दृष्टिपथात आला. दोन दिवसांत तब्बल ३२ गडी बाद झाले, पण कसोटीचे कौशल्य आणि दर्जा मात्र पडलेला दिसला. नंबर वन असलेला द. आफ्रिका संघ २००६ पासून परदेशात कसोटी मालिका जिंकत आला आहे. नागपूर सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा हा विक्रम मोडीत निघेल. जामठ्याच्या मातीमय झालेल्या खेळपट्टीवर एकाच दिशी २० गडी बाद होण्याच्या विक्रमाशीही बरोबरी झाली.
क्रिकेट चाहत्यांसाठी हे आकडे उत्साहवर्धक असू शकतील, पण क्रिकेटच्या लोकप्रियतेला मागे खेचणारे आहेत. कसोटी सामना फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीची परीक्षा घेणारा असतो. या कसोटीत असे काहीही दिसत नाही. यजमान देशाला पूरक ठरतील अशी खेळपट्टी देण्याचे संकेत असले तरी इतकी खराब खेळपट्टी बनविल्यास विरोधी संघ निराशेच्या गर्तेत लोटतो. वन-डे आणि टी-२० मालिका गमविल्याचा वचपा कदाचित मालिका विजयातून काढायचा बीसीसीआयने निर्धार केला असावा असा निष्कर्ष सामना पाहणारे सहज काढू शकतील. हा वेळ, पैसा आणि मेहनतीचा अपव्यय आहे. अशा खेळपट्टीमुळे कसोटी सामन्यातून चांगले फलंदाज आणि गोलंदाज मिळणार नाहीत हा बोध घ्यायला हवा. आम्हाला हिरव्यागार खेळपट्ट्या नव्हे, पण ज्या दोन दिवसांत निकाल देतील अशाही खेळपट्ट्या नकोत. अशाच खराब विकेटवर खेळत राहिल्यास विक्रम होत राहतील, पण टीम इंडियाला चांगले क्रिकेटपटू मिळणार नाहीत. सध्याच्या संघाकडे पाहिल्यास कसोटी दर्जाचा हाच तो संघ का, असा सहज प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येईल. नको ते शॉट्स मारण्याची घाई, संयम न दाखविणे, शैलीदार फलंदाजी संपल्यात जमा झाल्यासारखे दिसत आहे. कसोटीचा निकाल यावा आणि निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या हव्यात हे पटण्यासारखे आहे.

Web Title: Jumath cricket soil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.