जोश्ना चिनप्पाची बाजी

By Admin | Updated: September 7, 2015 00:27 IST2015-09-07T00:27:54+5:302015-09-07T00:27:54+5:30

भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने चमकदार कामगिरी करताना रविवारी पार पडलेल्या इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेत महिलांचे विजेतेपद पटकावले

Joshna Chinappa's bet | जोश्ना चिनप्पाची बाजी

जोश्ना चिनप्पाची बाजी

मुंबई : भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने चमकदार कामगिरी करताना रविवारी पार पडलेल्या इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेत महिलांचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी भारताचे आशास्थान असलेल्या महेश माणगावकरला मात्र पुरुषांच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने भारताच्या दुहेरी विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या झालेल्या या स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात जोश्नाने आक्रमक खेळ करताना इजिप्तच्या अग्रमानांकित हबिबा मोहम्मदचा केवळ ४७ मिनिटांमध्ये ३-० असा फडशा पाडला. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये जोश्नाने हबिबाकडून कडवा प्रतिकार मिळाला. मात्र अंतिम क्षणी बाजी मारत तिने २-० अशी भक्कम आघाडी घेतली. यावेळी हबिबा पुनरागमन करणार अशी शक्यता होती. मात्र विजेतेपद निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना जोश्नाने तिसऱ्या गेममध्ये तुफान आक्रमक खेळ करताना हबिबाला दडपणाखाली ठेवले आणि ११-८, ११-९, ११-६ असा विजय मिळवला.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या अंतिम सामन्यात मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अव्वल खेळाडू इंग्लंडच्या अ‍ॅड्रीयन वॉलरने अपेक्षित वर्चस्व राखताना यजमान भारताच्या महेशचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून विजेतेपदावर नाव कोरले. पहिले दोन गेम गमावून पिछाडीवर पडलेल्या महेशने झुंजार खेळ करताना तिसऱ्या गेममध्ये १४-१२ अशी बाजी मारीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महेश सामन्यात बरोबरी साधणार असे दिसत होते. मात्र यानंतर अनुभवी वॉलरने महेशला फारशी संधी न देता ६१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ११-९, ११-२, १२-१४, ११-६ असे विजेतेपद पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Joshna Chinappa's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.