‘राफा’वर जोको भारी!
By Admin | Updated: June 4, 2015 08:42 IST2015-06-04T01:36:12+5:302015-06-04T08:42:31+5:30
क्ले कोर्टचा बादशाह आणि फ्रेंच ओपनचे ९ वेळा विजेतेपद पटकाविणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला बुधवारी पराभवाचा धक्का बसला

‘राफा’वर जोको भारी!
पॅरीस : क्ले कोर्टचा बादशाह आणि फ्रेंच ओपनचे ९ वेळा विजेतेपद पटकाविणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला बुधवारी पराभवाचा धक्का बसला. सर्बियाचा नोवाक जोकोविच हा त्याच्यावर ‘भारी’ पडला. नदालचा ७-५, ६-३, ६-१ ने पराभव करीत नोवाक जोकाविचने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उल्लेखनिय म्हणजे, लाल मातीवरचा बादशाह असलेल्या राफेल नदालचा रोलँड गॅरोस मैदानावरील हा ७२ सामन्यांतून दुसरा पराभव आहे. दुसऱ्या सामन्यांत अॅण्डी मरे याने डेव्हीड फेरर याला पराभवाची धूळ चारली. आता या दोन्ही विजेंत्यामध्ये लढत होईल.
जगात अव्वल क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचनेयेथील मैदानावर गेल्या सातही सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे चाहत्यांची नजर या सामन्याकडे अधिक होती. नदालवर जोकोविच भारी पडणार, असा अंदाज असला तरी सामन्याची उत्सुकता अधिक होती. जोकाविचने २०१२ आणि २०१४ मधील अंतिम सामन्यांतील पराभवाचा वचपा काढला. जोकोवीचने सामन्यात ४५ विनर लगावले तर नदालला केवळ १६ विनर लगावता आले. ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित अॅडी मरे याने स्पेनच्या डेव्हिड फेरर याला ७-६, ६-२, ५-७, ६-१ अशी मात दिली. जोकाविच आता आपल्या कारकीर्दीतील २६ व्या ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत अँण्डी मरे याच्याशी झुंजेल.
(वृत्तसंस्था)