ज्यु. क्रिकेटपटूंसाठी योजना आखण्याची गरज
By Admin | Updated: December 2, 2015 04:04 IST2015-12-02T04:04:41+5:302015-12-02T04:04:41+5:30
भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय

ज्यु. क्रिकेटपटूंसाठी योजना आखण्याची गरज
नवी दिल्ली : भारतात ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी पायाभूत सुविधा आणि योजना उभारण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ज्युनियर स्तरावर वय लपविण्याचे प्रकार आणि संशयास्पद गोलंदाजी थांबविण्यासाठी योजना आखण्याचे द्रविडने बीसीसीआयला आवाहन केले.
चौथ्या टायगर पतौडी स्मृती लेक्चर सीरिजमध्ये व्याख्यान देताना द्रविड म्हणाला, ‘‘१९ वर्षे वयाच्या खेळाडूची संशयास्पद गोलंदाजीसाठी तक्रार झाल्याचे ऐकून मला धक्का बसला.’’ त्याची ही शैली चेक करण्यासाठी कोच नव्हते काय? त्याच्या संशयास्पद शैलीची सुरुवात दहा वर्षांआधी झाली होती काय? तो विकेट घेत सामना जिंकून देत असावा, म्हणून कोचने डोळेझाक केली का, असे उद्विग्न प्रश्न द्रविडने विचारले. तो म्हणाला, ‘‘१९ वर्षांचा मुलगा कठोर मेहनत घेत विश्वचषकात खेळत असेल व नंतर संशयास्पद गोलंदाजीसाठी बाहेर काढला जात असेल तर त्याचे निराश होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या झटपट निकाल देणाऱ्या घटनांवर भर दिल्याने ज्युनियर स्तरावर अधिक वयाचे खेळाडू खेळण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा एखादा कोच खेळाडूचे वय बदलून त्याला स्थानिक स्पर्धेत खेळण्याची परवानगी देतो.’’
बीसीसीआयने युवा खेळाडूंना आकर्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही युवा खेळाडूंना आकर्षित करण्याची योजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याने प्रतिभावान खेळाडू पुढे येताना दिसत नाहीत. क्रिकेटसाहित्याच्या विक्रीत मंदी आल्याचे एका नामांकित क्रिकेटसाहित्य विक्रेत्या कंपनीने तथ्य उलगडले आहे.’’ बीसीसीआयने ज्युनियर स्तरावर चांगल्या योजना तयार कराव्यात; शिवाय मृदुभाषी प्रशिक्षक नेमावेत. ज्युनियर क्रिकेटमध्ये रोटेशन पद्धत अधिक प्रभावी ठरू शकेल. यामुळे खेळाडूंना पुरेशी संधी उपलब्ध होईल. युवा खेळाडू विविध कारणांनी लवकर क्रिकेटकडे पाठ फिरवितात. आई-वडिलांच्या अपेक्षांची पूर्तता न होणे, हे यामागील मोठे कारण आहे. खेळाडूंनी खेळासोबतच शिक्षणात सातत्य राखल्यास ते चांगले नागरिक बनू शकतील, असे तो म्हणाला.(वृत्तसंस्था)
एखादा खेळाडू वय लपवून संघात स्थान मिळवीत असेल आणि खेळत असेल तर प्रामाणिक आणि प्रतिभावान खेळाडूवर याचा विपरीत परिणाम होतो. प्रामाणिक खेळाडूला संघातील स्थान गमवावे लागल्याने त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
- राहुल द्रविड