जयंत, ईशांतला पुढच्या कसोटीतून वगळले जाऊ शकते : अझहरुद्दीन
By Admin | Updated: February 26, 2017 23:46 IST2017-02-26T23:46:37+5:302017-02-26T23:46:37+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल करावा लागू शकतो

जयंत, ईशांतला पुढच्या कसोटीतून वगळले जाऊ शकते : अझहरुद्दीन
नवी दिल्ली : पहिल्या कसोटीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल करावा लागू शकतो, असे मत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने व्यक्त केले.
अझहरुद्दीन म्हणाला, ‘फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर आला. मालिका गमावली नसली, तरी कुठल्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळायचे आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. चिन्नास्वामी स्टेडियममधील खेळपट्टीवर चेंडू अशाप्रकारे वळतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे अंतिम संघातून जयंत यादव व ईशांत शर्मा यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे.’
भारताला पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि बंगळुरूमध्ये दुसरा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळल्या जाणार आहे.
अझहरुद्दीन पुढे म्हणाला, ‘भारतीय संघाची फलंदाजी बघितल्यानंतर अतिरिक्त फलंदाज खेळविण्यात येण्याची शक्यता आहे. करुण नायरला जयंत यादवच्या स्थानी संधी मिळू शकते. भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप बघता ईशांतची बॅक आॅफ लेंथ गोलंदाजी उपयुक्त ठरू शकत नाही. त्यामुळे विराटने भुवनेश्वरसारख्या स्विंग गोलंदाजाला संघामध्ये संधी द्यायला हवी.’ भारतातर्फे ९९ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा आणि जवळजवळ एक दशक संघाचे नेतृत्व करणाऱ्या अझहरुद्दीनने भारतीय फिरकीपटूंच्या कामगिरीवर टीका केली.
‘मायकल क्लार्कने मुंबईमध्ये ९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते त्यावेळीही अशाच प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी चांगली नव्हती. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंची कामगिरी समाधानकारक नव्हती. विशेषत: रवींद्र जडेजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.’
स्टीव्ह ओकिफीने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची, याचा धडा दिला आहे. ओकिफीने राखलेला टप्पा व दिशा अचूक होता.
त्याप्रमाणे जडेजाने गोलंदाजी करायला हवी होती. जडेजाने उजवी यष्टी किंवा उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली. तो खरबडीत झालेल्या खेळपट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत होता आणि तेथेच त्याची चूक झाली. या खेळपट्टीवर त्याला अशाप्रकारे बळी मिळू शकत नव्हते आणि नेमके तेच घडले, असेही अझरुद्दीन म्हणाला. (वृत्तसंस्था)
ओकिफीने मधल्या व डाव्या यष्टीच्या दिशेने गोलंदाजी केली. त्याने चेंडू अधिक वळवण्याचा प्रयत्न केला नाही. फलंदाजाला त्याने खेळण्यास बाध्य केले. त्यामुळे त्याने चार खेळाडूंना पायचित केले. डावखुरा फिरकीपटू जर चार खेळाडूंना पायचित करीत असेल तो सरळ चेंडू टाकत आहे, हे सिद्ध होते. उर्वरित काम खेळपट्टीने केले. भारतीय फलंदाज फिरकीसाठी खेळत होते. याचा अर्थ जडेजाच्या तुलनेत ओकिफीने खेळपट्टीचे चांगले आकलन केले. आश्विनबाबत विचार करता, या खेळपट्टीवर १०० पेक्षा अधिक धावा बहाल करणे म्हणजे निराशाजनक कामगिरी म्हणता येईल, - मोहम्मद अझरुद्दीन