जयभगवान निलंबित
By Admin | Updated: October 8, 2015 04:25 IST2015-10-08T04:25:26+5:302015-10-08T04:25:26+5:30
येथील आदमपूर मंडीतील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेला आॅलिम्पिक आणि अर्जुन पुरस्कारविजेता बॉक्सर जयभगवान याला

जयभगवान निलंबित
हिसार : येथील आदमपूर मंडीतील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेला आॅलिम्पिक आणि अर्जुन पुरस्कारविजेता बॉक्सर जयभगवान याला हरियाणा पोलीस निरीक्षकपदावरून निलंबित करण्यात आले आहे.
जयभगवान याला मंगळवारी पोलीस अपअधीक्षक भगवान दास यांच्या तपास अहवालाच्या आधारे अधीक्षक सतेंदर गुप्ता यांनी निलंबित केले. या प्रकरणात एक पोलीस कर्मचारीदेखील निलंबित झाला आहे. आदमपूर मंडीतील व्यापारी मुकेश गोयल याने दिलेल्या तक्रारीनुसार आदमपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयभगवान आणि काही पोलीस कर्मचारी ३१ आॅगस्ट रोजी दुकानात धडकले. जुगार खेळण्याच्या नावाखाली माझा भाऊ आणि अन्य चार जणांना त्यांनी अटक केली. जयभगवान यांनी सर्वांना सोडून देण्यासाठी कथितरीत्या एक लाखाची लाच मागितली. मंडीतील अन्य एक व्यापारी अनिल गोयल यांच्यामार्फत ही रक्कम पोहोचताच सर्व जणांची मुक्तता करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांनी जयभगवान यांची पोलीस लाईन येथे बदली केली होती. वादग्रस्त बनलेला जयभगवान हा हरियाणाचा दुसरा आॅलिम्पिक बॉक्सर आहे. याआधी २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यविजेता विजेंदरसिंग याचे नाव पंजाबातील एका ड्रग रॅकेटमध्ये आले होते. नंतर मात्र या प्रकरणी विजेंदरला क्लीन चिट देण्यात आली. (वृत्तसंस्था)