महाराष्ट्राच्या जेह पंडोलेची दमदार आगेकूच
By Admin | Updated: July 20, 2016 21:24 IST2016-07-20T21:24:28+5:302016-07-20T21:24:28+5:30
महाराष्ट्राच्या जेह पंडोले आणि अहान भन्साली यांनी आपआपल्या सामन्यात शानदार विजय मिळवत इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील

महाराष्ट्राच्या जेह पंडोलेची दमदार आगेकूच
इंडियन क्लासिक स्क्वॉश : अहान भन्साली, वीर छोत्रानी यांचीही चमक
मुंबई : महाराष्ट्राच्या जेह पंडोले आणि अहान भन्साली यांनी आपआपल्या सामन्यात शानदार विजय मिळवत इंडियन क्लासिक ज्युनियर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या गटात तिसरी फेरी गाठली. तर १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या वीर छोत्रानीने उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारवर ३-१ असा विजय मिळवत आगेकूच कायम राखली.
भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाच्या मान्यतेने देशी-विदेशी ज्युनियर स्क्वॉशपटूंचे थरारक सामने एनएससीआय येथे सुरु आहेत. तीन सेटमध्ये झालेल्या एकतर्फी सामन्यात जेहने एकहाती वर्चस्व राखत ११-०, ११-०, ११-३ असा विजय मिळवत आगेकूच केली. तर अन्य सामन्यात महाराष्ट्राच्या अहानने तामिळानाडूच्या अनुश करचा ११-१, ११-१, ११-१ असा धुव्वा उडवला.
१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या वीर छोत्रानीने आक्रमक खेळाच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारचा १२-१४, ११-७, ११-९, १२-१० असा पिछाडीवरुन धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा अन्य खेळाडू मानव मंढीयन याने देखील पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना दिल्लीच्या आयान बेरीचा १०-१२, ११-४, ११-६, ७-११, ११-८ असा पाडाव केला. अंश पंजाबीने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना दिल्लीकर अरमान अगरवालचा ११-५, ११-६, ११-२ असा फडशा पाडला.
१९ वर्षांखालील गटात देखील महाराष्ट्राच्या अमन कुभांनी आणि प्रदिप चौधरी यांनी आपआपल्या सामन्यात विजयांनी नोंद केली. अमनने महाराष्ट्राच्याच मिहीर प्रकाशचा ११-६, ११-५, ११-४ आणि प्रदिपने आंध्र प्रदेशच्या नसीम अलीचा ११-८, ११-२, ८-११, ११-४ असा पराभव केला.
मुलींच्या १३ वर्षांखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराश केली. इश्ती मेहता हिला तामिळनाडूच्या तमन्ना डी. विरुद्ध ११-९, ६-११, ५-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला. तर तनया बाफना हिलाही तामिळनाडूच्याच अस्मिता अरुमुगमविरुद्ध ३-११, ४-११, ३-११ असे पराभूत व्हावे लागले. तसेच महाराष्ट्राच्या मन्नत शाहचे आव्हान गोव्याच्या तनिष्का सिंगविरुद्ध ६-११, ४-११, ३-११ असे संपुष्टात आले. (क्रीडा प्रतिनिधी)