जॅकसन ते फव्हेला!

By Admin | Updated: July 5, 2014 04:49 IST2014-07-05T04:49:21+5:302014-07-05T04:49:21+5:30

चार्ली चॅपलीन ब्राझीलियन असता तर त्यात त्यानं भर घालून म्हटलं असतं की, तुम्ही ज्या दिवशी हसत नाही अन् नाचत नाही तो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक दिवस

Jackson Fovea! | जॅकसन ते फव्हेला!

जॅकसन ते फव्हेला!



संदीप चव्हाण, ब्राझील

चार्ली चॅपलीननं एके ठिकाणी म्हटलं होतं की, तुमच्या आयुष्यातील सर्वांत निरर्थक दिवस म्हणजे, ज्या दिवशी तुम्ही हसत नाही... चार्ली ब्राझीलियन असता तर त्यात त्यानं भर घालून म्हटलं असतं की, तुम्ही ज्या दिवशी हसत नाही अन् नाचत नाही तो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक दिवस... सॅल्वाडोरमध्ये तुम्हाला भेटणारा प्रत्येकजण हसतच तुमचं स्वागत करतो; पण चार्लीच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर हसणारा प्रत्येक चेहरा सुखी असतोच असं नाही...परवा सॅल्वाडोरमध्ये अमेरिका आणि बेल्जियम दरम्यान मॅच झाली. या मॅच दरम्यान इटलीच्या मारिओनं सुपरमॅनची जर्सी घालून मॅच सुरू असताना मैदानात घुसखोरी केली होती. त्यानं त्याच्या जर्सीवर ‘फव्हेला’ असं लिहिलं होतं... मारिओनं मैदानात घुसखोरी केल्याच्या बातम्या येथीलच काय जगभरातील माध्यमांनी छापल्या; पण त्यापैकी कितीजणांनी या ‘फव्हेला’चा माग घ्यायचा प्रयत्न केला. फव्हेला म्हणजे झोपडपट्टी... आपल्या येथे धारावी जसा फॉरेनरसाठी पिकनिक स्पॉट बनलाय, तसा सॅल्वाडोरमध्ये ‘फव्हेला’... याच फव्हेलाची दर्दभरी दास्तान अवघ्या जगाला सांगण्यासाठी पॉप संगीताचा बेताज बादशहा मायकल जॅकसन सॅल्वाडोरमध्ये धडकला होता...त्याचा ‘दे डोंट केअर अबाऊट अस’ हा अल्बम त्याकाळी म्हणजे १९९६ साली सुपरडुपर हिट झाला होता. रिओ आणि सॅल्वाडोरच्या फव्हेलावर त्यानं स्वत: गीत रचलं होतं आणि नृत्यही केलं होतं... माझं हॉटेल एअरपोर्टच्या जवळ... शहरापासून दूर...त्यामुळेच माझ्या हॉटेलपासून हे फव्हेला अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर. अ‍ॅटलांटिक समुद्राशी लगट करणारं. उंचच उंच इमारतींचे सॅल्वाडोर शहर एकीकडे, तर दुसरीकडे गावकुसाबाहेर वसलेलं हे फव्हेला... मायकेल जॅकसननं जेथे या गाण्याचं शूटिंग केलं तो स्पॉट सध्या पिकनिक स्पॉट झालाय... त्या गाण्यात मायकल जॅकसननं फव्हेलातील वंचितांची व्यथा मांडली होती. ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईमुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या होत्या. वाढती बेरोजगारी, त्यातून वाढणारी गुन्हेगारी यामुळे फव्हेलातील जीवन नरकसमान झालं होतं... आजही त्यात काही फारसा फरक पडलेला नाही... पण, १९९६ साली मायकल जॅकसननं हे गाणं येथे सॅल्वाडोरमध्ये चित्रीत केल्यानंतर त्याच्या त्या अल्बमवर ब्राझीलमध्ये बंदी घालण्यात आली होती. कारण त्यावेळेच्या सरकारला २००४ सालच्या आॅलिम्पिक यजमानपदाची चिंता लागली होती. मायकल जॅकसनच्या या अल्बममुळे ब्राझीलची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होण्याची भीती सरकारला होती. शूटिंगच्या वेळीही जॅकसनला स्थानिक प्रशासनाकडून असहकार्य दिले गेले; पण फव्हेलातील गरीब जनता जॅकसनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली... मायकल जॅकसनचा हा अल्बम अवघ्या युरोपमध्ये लोकप्रिय झाला. जर्मनीत तर तब्बल ३० आठवडे तो ‘टॉप टेन’मध्ये होता. जॅकसनच्या दुसऱ्या कुठल्याही अल्बमला जर्मनीत एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती; पण अमेरिकेत तो फारसा खपला नाही. नियती बघा आज १८ वर्षे उलटली. इटलीच्या मारिओ या घुसखोरामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंही नेमक्या अमेरिकेच्याच मॅचमध्ये घुसखोरी केली. आज जॅकसन जिवंत नाही आणि ज्या भीतीपोटी ब्राझीलनं जॅकसनच्या त्या अल्बमवर बंदी घातली होती, ती भीतीही आता राहिली नाही. २०१६ मध्ये ब्राझीलच्या रिओत आॅलिम्पिक होतेय आणि फुटबॉलचा विश्वचषकही सध्या ब्राझीलमध्ये सुरू आहे. पण, हटली नाही ती या ‘फव्हेला’तील गरिबी...

Web Title: Jackson Fovea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.