इव्हानोव्हीच व सफारोव्हा उपांत्य फेरीत

By Admin | Updated: June 3, 2015 00:36 IST2015-06-03T00:36:00+5:302015-06-03T00:36:00+5:30

अ‍ॅना इव्हानोव्हीचने मंगळवारी युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा पराभव करीत सात वर्षांत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.

Ivanovic and Safarovo in the semifinals | इव्हानोव्हीच व सफारोव्हा उपांत्य फेरीत

इव्हानोव्हीच व सफारोव्हा उपांत्य फेरीत

पॅरिस : अ‍ॅना इव्हानोव्हीचने मंगळवारी युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा पराभव करीत सात वर्षांत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. इव्हानोव्हिचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. २००८ मध्ये पॅरिसमध्ये एकमेव ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या इव्हानोव्हिचने स्वितोलिनाचा ६-३, ६-२ ने पराभव केला. स्वितोलिनाविरुद्ध सात सामन्यांतील इव्हानोव्हिचचा हा सातवा विजय आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत स्थान मिळवण्यासाठी इव्हानोव्हिचला उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकच्या १३ व्या मानांकित लुसी सफारोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सफारोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत २१ व्या मानांकित स्पेनच्या गारबाइन मुगुरुजाचा ७-६, ६-३ ने पराभव केला. इव्हानोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वी रोला गॅरोमध्ये इव्हानोव्हिचने २००७ व २००८ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. २००७ मध्ये विम्बल्डन व २००८ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही इव्हानोव्हिचने अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले होते.
त्याआधी, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल व ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
अव्वल मानांकित जोकोव्हिचने २० व्या मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केचा ६-१, ६-२, ६-३ ने पराभव केला. जोकोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीत सहावे मानांकन प्राप्त स्पेनच्या राफेल नदालच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. नदालने अमेरिकेच्या जॅक साकविरुद्ध ६-३, ६-१, ५-७, ६-२ ने विजय मिळवला.
त्याआधी, फेडररने चौथ्या फेरीच्या लढतीत १३ व्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सचा ६-३, ४-६, ६-४, ६-१ ने पराभव केला. फेडररला पुढच्या फेरीत स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मरेने फ्रान्सच्या जर्मी चार्डीविरुद्ध ६-४, ३-६, ६-३, ६-२ ने सरशी साधली. मरेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला विभागात चौथ्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाला पराभव स्वीकारावा लागला. २३ व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या टिमिया बासिनस्कीने क्वितोव्हाचा २-६, ६-०, ६-३ ने पराभव करीत पुढची फेरी गाठली.

Web Title: Ivanovic and Safarovo in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.