क्रिकेटपासून लांब राहणं अशक्य, कोचिंग किंवा कॉमेंटरी करणार - सेहवाग
By Admin | Updated: October 20, 2015 16:50 IST2015-10-20T16:23:22+5:302015-10-20T16:50:31+5:30
क्रिकेट हेच माझं जीवन असल्यामुळे मी क्रिकेटपासून लांब राहूच शकत नाही असं सांगताना भावनाप्रधान झालेल्या विरेंद्र सेहवागने मी एकतर कोच होणं पसंत करीन किंवा समालोचन करेन

क्रिकेटपासून लांब राहणं अशक्य, कोचिंग किंवा कॉमेंटरी करणार - सेहवाग
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - क्रिकेट हेच माझं जीवन असल्यामुळे मी क्रिकेटपासून लांब राहूच शकत नाही असं सांगताना भावनाप्रधान झालेल्या विरेंद्र सेहवागने मी एकतर कोच होणं पसंत करीन किंवा समालोचन करेन असं निवृत्ती जाहीर केल्यानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं.
सौरभ गांगुलीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये आलो, अशा शब्दांत गांगुलीचे आभार मानणा-या सेहवागने तेंडुलकर, द्रविड, गंभीर, कुंबळे, श्रीनाथ आदी सगळ्या सहक्रीडापटुंची आठवण काढत त्यांचे आभार मानले. गांगुलीने तर तेंडुलकर सोबत सलामीला पाठवताना स्वत:च्या फलंदाजीच्या जागेवर पाणी सोडलं. त्याच्या या त्यागाबद्दल मी अत्यंत ऋणी असल्याचं सेहवाग म्हणाला.
प्रत्येक बॉलवर धावा करण्याचे ध्येय मी कायम ठेवल्याचे सांगताना सेहवागने त्याच्या आक्रमक शैलीचा उल्लेख केला. तसेच द्रविड, गांगुली व लक्ष्मणसारखे भरवशाचे फलंदाज आपल्यामागे खेळायला येत असल्यामुळे गरज पडल्यास ते संघाची फलंदाजी सांभाळू शकतात असा विश्वास असल्यामुळे मी धोका पत्करू शकलो आणि आक्रमक फलंदाजी करू शकले असेही सेहवागने सांगितले.
जवळपास सगळ्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा सेहवाग एकमेव गोलंदाजाला घाबरायचा, तो म्हणजे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन. त्याच्या गोलंदाजीचा मी धसका घेतला होता हे देखील सेहवागने दिलखुलासपणे मान्य केले.
अत्यंत साध्या व सहज स्वभावाचे दर्शन घडवताना सेहवागने मी ३०० धावा केल्या त्यावेळी हा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय फलंदाज असल्याचे माहितही नव्हते, व तो विक्रम पार पडल्यावरच मला ते कळल्याचेही सेहवागने सांगितले.