धोनीला टार्गेट करणे चुकीचे !
By Admin | Updated: October 14, 2015 00:07 IST2015-10-14T00:07:09+5:302015-10-14T00:07:09+5:30
उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली.

धोनीला टार्गेट करणे चुकीचे !
सचिन कोरडे
उत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या महेंद्रसिंह धोनीमुळे आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, अशी ओरड झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीवरही चर्चा रंगली. असे असले तरी या खेळाडूमधील ‘जज्बा’ कायम आहे. तोच संघातील खरा ‘मॅच टर्नर’ आहे.सध्या तरी त्याला टार्गेट करणे चुकीचे आहे, असे सध्या भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले विनोद फडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते इंदूर येथून दूरध्वनीवरून बोलत होते.
भारतीय संघाचे मंगळवारी इंदूर येथे विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. चाहत्यांच्या स्वागताने खेळाडूंचाही उत्साह वाढला. हाच संघ आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने खचून गेला होता. हातचा सामना गमावल्याने खेळाडू दु:खी झाले होते; मात्र संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खेळाडूंना आत्मविश्वासाचे बळ दिले. त्यामुळे होळकर स्टेडियमवर हा संघ नव्या उमेदीने मैदानावर उतरेल, असेही फडके म्हणाले.
धोनीपर्व समाप्तीकडे आहे काय, यावर मात्र फडके यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘धोनीने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती, असे मला वाटते. मात्र, हा निर्णय निवड समितीचा आहे. त्याने निवृत्ती घ्यावी, याचा अर्थ त्याच्यातील खेळ संपला, असे नाही. सध्या भारतीय संघातील तोच खरा ‘टर्नर’ आहे.
विराट, रैना अपयशी
स्टार फलंदाज विराट कोहली आणि सुरेश रैना हेसुद्धा अपयशी ठरले आहेत. या दोघांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे पराभवाला एकटा धोनी जबाबदार नाही. इतरांनीही सामना जिंकून द्यायला हवा. दुसरीकडे, भारतीय जलदगती गोलंदाजी कमकुवत आहे. त्यात सुधारणेची गरज आहे. केवळ फिरकीपटूंच्या कामगिरीवर सामना जिंकणे कठीण असते. मोहंमद शमी हा दुखापतग्रस्त असल्याने त्याची कमतरताही संघाला भासत आहे. शमी हा धावांची गती कमी राखण्यास मदत करतो.
संघात ‘गटबाजी’ नाही!
धोनी आणि विराट कोहली यांचे संघात गट आहेत काय, यावर फडके यांनी संघात एकजूट असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘ड्रेसिंग रूममधील वातावरण ‘फ्रेंडली’ आहे. विराट-धोनी यांच्यात कुठलेही गैरसमज नाहीत. ते केवळ माध्यमांनी तयार केले आहेत.
ड्रेसिंग रूमचे नाव राहुल द्रविड
होळकर स्टेडियमवर भारतीय संघासाठी खास ड्रेसिंग रूम तयार करण्यात आली आहे. तिला राहुल द्रविडचे नाव देण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे संघाला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे मध्य प्रदेश संघटनेने ही खास योजना आखली.