तिकिटासाठी १५ तासांपूर्वीच लागली रांग
By Admin | Updated: October 6, 2015 01:25 IST2015-10-06T01:25:13+5:302015-10-06T01:25:13+5:30
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

तिकिटासाठी १५ तासांपूर्वीच लागली रांग
- क्रिकेट पाससाठी फुकट्यांची फिल्डिंग
कानपूर : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. पण, या विविध यंत्रणांकडून होत असलेल्या फुटक पासच्या मागणीमुळे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना मात्र हैराण झाली आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिला एकदिवसीय सामना होत आहे. या विविध सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांकडून क्रिकेट संघटनेकडे या सामन्याच्या फ्री पासची मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर जेवण, शीतपेय, चहा यांसाठीदेखील फ्री कूपनाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने तर, आम्हाला प्रदेश मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना पास द्यायचे आहेत; त्यामुळे अधिक पास देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचा एक अधिकारी म्हणाला, ‘‘जिल्हा प्रशासनाकडून आमच्याकडे तब्बल ६ हजार पास देण्याची मागणी करण्यात आली आहे. इतके पास देणे
आम्हाला शक्य नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळापासून उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटना यांना आम्हाला पास द्यावे लागतील.’’
तसेच, याशिवाय त्यांच्या भोजनाची व्यवस्थादेखील आम्हाला करावी लागेल. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच लाखो रुपये किमतीच्या व्हीआयपी बॉक्सवर आपला अधिकार राखून ठेवला आहे. असे असूनही त्यांच्याकडून मोफत पास मागितले जात आहेत. त्यामुळे आम्हाला असे पास देणे कठीण असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
१५ तास आधीच रांगा..
-क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळावे, यासाठी ग्रीन पार्क मैदानाबाहेर विद्यार्थी गॅलरीसाठी चाहत्यांनी तिकीटविक्री सुरू होण्यापूर्वी १५ तास आधीच रांग लावली होती.
-सोमवारी सकाळी दहा वाजता तिकीटविक्री सुरू होणार होती. तब्बल एक हजार क्रिकेट चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली होती. तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर हा आकडा अडीच हजारांच्या वर गेला. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.
-तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर उसळलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी हे वृत्त फेटाळले आहे. लाठीमार केला नसून, गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बळ वापरल्याचे एसएसपी शलभ माथूर यांनी सांगितले.