राष्ट्रध्वजाखाली बॉक्सर खेळणे अशक्य
By Admin | Updated: August 28, 2014 01:53 IST2014-08-28T01:53:42+5:302014-08-28T01:53:42+5:30
साईचे महासंचालक जीजी थॉम्सन यांनी ही शंका उपस्थित केली.

राष्ट्रध्वजाखाली बॉक्सर खेळणे अशक्य
नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास भारतीय मुष्टियोद्ध्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूहोणा-या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
साईचे महासंचालक जीजी थॉम्सन यांनी ही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास आमच्या मुष्टियोद्ध्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानही भारतीय खेळाडू खूप हताश होते. तातडीने निवडणुका होतील हा विचार करून त्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. वेळेत निवडणुका होतील अशी मला आशा आहे. अन्यथा आमचे मुष्ट्यिोद्धे राष्ट्रीय ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत.
साईचे कार्यकारी संचालक सुधीर सोतिया यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या सापत्न वागणुकीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मुष्ट्यिोद्ध्यांना खूपच नुकसान सोसावे लागत आहे. हे बॉक्सिंग इंडिया आणि एआयबीए यांच्यातील प्रकरण आहे आणि त्यात सरकार अथवा साई मध्यस्थी करूशकत नाही. मुष्टियोद्ध्यांना परदेशात सराव अथवा प्रशिक्षणासाठी पाठवायचे असल्यास त्यांना पाठवण्याची आम्हाला कोणतीही अडचण नाही; परंतु एआयबीएच्या सापत्न वागणुकीमुळे आता कोणताही देश आम्हाला आमंत्रित करीत नाही. परदेशात स्पर्धा किंवा दौरा या आमंत्रणावर आधारित असतात. गत दहा वर्षांपासून क्युबाने भारतीय मुष्टियोद्ध्यांना नेहमीच मदत केली आहे; परंतु एआयबीएच्या वर्तनामुळे त्यांनी देखील आमच्या मुष्टियोद्ध्यांना आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. आम्हाला विविध सूत्रांनुसार भारतीय मुष्टियोद्ध्यांच्या वादामुळे खूप नुकसान झाले आहे. प्रशिक्षकांनाही भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेत राष्ट्रध्वजाखाली खेळू शकणार नसल्याची धास्ती वाटत आहे. (वृत्तसंस्था)