आयएसएल-आयलीगचे विलीनीकरण शक्य
By Admin | Updated: September 5, 2015 23:54 IST2015-09-05T23:54:17+5:302015-09-05T23:54:17+5:30
प्रायोजक आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याअभावी दुर्लक्षित झालेल्या आयलीगचे इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विलीनीकरण शक्य असल्याचे मत अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)

आयएसएल-आयलीगचे विलीनीकरण शक्य
मुंबई : प्रायोजक आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याअभावी दुर्लक्षित झालेल्या आयलीगचे इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विलीनीकरण शक्य असल्याचे मत अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे.
यंदा दुसऱ्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आयएसएलमध्ये बॉलिवूड ताऱ्यांनी संघ खरेदी केले, शिवाय उत्कृष्ट मार्केंिटंगमुळे स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादही लाभला. दुसरीकडे प्रेक्षक आणि प्रायोजकांनी पाठ फिरविल्याने सर्वांत जुनी आयलीग संकटात आली. आयएसएल प्रायोजक तसेच आयलीग क्लबच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर एआयएफएफ प्रमुखांनी दोन्ही स्पर्धांच्या विलीनीकरणाचे संकेत दिले. आयलीगला फिफाची मान्यता असल्याने या स्पर्धेचे वेगळे महत्त्व असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. सध्या तरी आयलीगच्या अस्तित्वाला कुठलाही धोका नाही.
आयएसएल-आयलीग
आयएसएल आणि आयलीग क्लब्स यांच्यात भविष्यात तडजोड होऊ शकते, असे सांगून पटेल पुढे म्हणाले, ‘‘यावर चर्चा होत आहे; पण त्या प्रक्रियेला वेळ लागेल. आयएसएलच्या यशामुळे आयलीग क्लब्सच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आयलीग कशी लोकप्रिय करता येईल, यावर बैठकीत मंथन झाले. आयएसएलच्या यशामुळे आयलीग सामने टीव्हीवर पाहणाऱ्यांच्या संख्येत भर पडली; पण तरीही योग्य दिशेने वाटचाल करून उपाय शोधावेच लागतील.’’
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आयलीगला प्रमोट करण्याबाबतच्या उपायांबाबत पटेल यांनी माहिती दिली. त्यात सामन्यांच्या वेळेत बदल करणे, नव्या प्रसारणकर्त्यांसोबत करार, सोशल मीडिया, टीव्ही आणि रेडिओवर प्रचार आदींचा समावेश असल्याचे सांगितले. आयलीग आणि आयएसएल या दीर्घ काळ चालणाऱ्या स्पर्धा आहेत. राष्ट्रीय फुटबॉल संघटनेसाठी मात्र ही चिंता असल्याने दोन्ही स्पर्धांचे विलीनीकरण हाच पर्याय शिल्लक राहतो. नेमण्यात आलेली समिती सुचवेल. आम्ही एक कार्यसमूह तयार केला आहे.’’
पुणे एफसी आणि भारत एफसी या पुण्यातील दोन क्लबकडे आयलीगच्या पुढील सत्रासाठी पैसा नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले. यावर पटेल म्हणाले, ‘‘दोन्ही क्लबचे विलीनीकरण होऊन एक संघ उतरवावा, असा आम्ही तोडगा सुचविला आहे. पण, असे झाले नाही तरी भारतीय फुटबॉलचे नुकसान होणार नाही. अनेक क्लब विलीनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख कोच स्टीफन कॉन्स्टेटाईन आणि कर्णधार सुनील छेत्री यांनीदेखील लीगच्या विलीनीकरणाचे समर्थन केले.
आयलीग ही देशाची लीग आहे, तर आयएसएल एक स्पर्धा आहे. आयएसएल ही स्थायी स्पर्धा नाही, उलट आयलीग ही फिफा मान्यताप्राप्त आहे. आयलीगचे अस्तित्व देशातील प्रमुख लीगच्या स्तरावर असायला हवे.
- प्रफुल्ल पटेल