‘आयएसएल’मुळे नवे सुपरस्टार मिळतील
By Admin | Updated: November 17, 2014 01:44 IST2014-11-17T01:44:41+5:302014-11-17T01:44:41+5:30
भारतामध्ये उत्साही वातावरणात ‘आयएसएल’चा धडाकेबाज प्रारंभ झालाय. भारत हा ऊर्जावान देश आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनामुळे येथील फुटबॉल नवी उंची गाठेल,

‘आयएसएल’मुळे नवे सुपरस्टार मिळतील
भारतामध्ये उत्साही वातावरणात ‘आयएसएल’चा धडाकेबाज प्रारंभ झालाय. भारत हा ऊर्जावान देश आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनामुळे येथील फुटबॉल नवी उंची गाठेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. याआधीही मी अनेकदा भारतात आलोय; पण यावेळचा भारत दौरा खूप वेगळा आहे. यावेळी खेळांच्या मूलभूत चौकटीत लक्षणीय बदल झाले आहेत. स्टेडियम आकर्षक असून, येथील सुविधादेखील उच्च दर्जाच्या आहेत.
‘आयएसएल’चा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, युवा खेळाडू मोठ्या प्रमाणावर फुटबॉलकडे वळतील आणि यातूनच काही सुपरस्टार म्हणून पुढे येतील. सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आलेले फुटबॉलप्रेमी आपापल्या फेव्हरेट संघांना जल्लोषपूर्ण वातावरणात ‘चिअर अप’ करीत होते. अशा भारलेल्या वातावरणात समालोचन करण्याची मजा काही और असते... ही मजा मी सध्या लुटत आहे.
प्रत्येक सामन्यागणिक रोमांच वाढतोय. लोकांना ही स्पर्धा आवडतेय. ते मोठ्या संख्येने स्टेडियमवर येत आहेत. यामुळे आयोजकांना सहजपणे प्रायोजक मिळतील आणि पैसादेखील... वरील सर्व गोष्टींचे योग्य समीकरण जुळल्यामुळे साहजिकच भारतीय फुटबॉलचा विकास होईल. मला विचाराल तर, सध्या भारतात ‘आयएसएल’ला लाभणारे समर्थन पाहून मी खूश आहे. या लीगचा दर्जादेखील चांगला आहे. यामुळे येत्या काळात फुटबॉलला अधिक लोकाश्रय लाभेल, अशी आशा आहे. याआधी नेहरू चषक फुटबॉल स्पर्धेसाठी मी भारतात आलो होतो. त्यावेळी आणि आता खेळाडूंचा दर्जा, क्षमता यात मोठा फरक दिसून येतो. ‘आयएसएल’मुळे युवा खेळाडूंना जगातील काही अव्वल खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. त्यांच्यासाठी हा अनुभव खचितच मौल्यवान आहे. याचा फायदा त्यांना स्वत:ला अणि भारतीय फुटबॉललाही होईल. भारतीयांच्या प्रतिभेबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. यामुळेच फिफा येथे फुटबॉल अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथे फुटबॉलची क्रेझ वाढत आल्याचे हे द्योतक आहे.
दिल्ली डायनासमोज आणि पुणे सिटी यांच्यातील लढतीदरम्यान माझी भेट ‘फिफा’चे अधिकारी जेरोम वॉक यांच्याशी झाली. भारतीय खेळाडूंचे टॅलेंट बघून ते प्रभावित झाले आहेत.
(टीसीएम)
(लेखक क्रीडा समालोचक आहेत)
लढतींदरम्यान सेलिब्रिटींची उपस्थिती ही तर दुधात साखर! ग्लॅमर हा आता खेळाचा अविभाज्य भाग झाला आहे. लोकदेखील या गोष्टींचा आनंद लुटतात. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, संघमालकही प्रचंड उत्साहात आहेत. एकंदरीत सर्व वातावरण मंत्रमुग्ध करणारे आहे.