उमेशच्या स्थानी ईशांतला संधी?
By Admin | Updated: November 12, 2015 23:31 IST2015-11-12T23:31:14+5:302015-11-12T23:31:14+5:30
एक कसोटी सामन्याच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन करीत असलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धक्का देण्यास सज्ज आहे.

उमेशच्या स्थानी ईशांतला संधी?
बेंगळुरू : एक कसोटी सामन्याच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन करीत असलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धक्का देण्यास सज्ज आहे. शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला उमेश यादवच्या स्थानी अंतिम संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन अद्याप या महत्त्वाच्या लढतीपूर्वी पूर्णपणे फिट नाही. अंतिम संघात ईशांतच्या समावेशाबाबत साशंकता नाही, पण त्याला कुणाच्या स्थानी संधी मिळणार, हा प्रश्न आहे.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान मारा करणारा आणि दुसऱ्या डावात डीन एल्गरला बाद करणारा वरुण अॅरोन ईशांतची साथ देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या कसोटी सामन्यांत खेळणारा उमेश यादव सराव सत्रादरम्यान बराचवेळ क्षेत्ररक्षण ड्रिलमध्ये सहभागी झाला असल्याचे दिसून आले तर ईशांत व अॅरोन यांनी मुख्य नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला. ईशांतने बराचवेळ अघाडीच्या फळीतील जवळजवळ सर्वच फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी केली. त्यात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांचा समावेश होता. गेल्या दीड महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी ईशांतचा फॉर्म चांगला आहे. त्याने विदर्भाविरुद्ध रणजी सामन्यात ९ बळी घेतले. हरियाणाविरुद्ध दुखापतग्रस्त झालेल्या लढतीतही ईशांतने दोन बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)
बेंगळुरू कसोटीसाठी गुरकिरत भारतीय संघात
बेंगळुरू : अष्टपैलू गुरकिरत सिंग मान याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी याची माहिती दिली. भारतीय संघातील तीन खेळाडू रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि ईशांत शर्मा यांना रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यांच्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिलिज करण्यात आले आहे. त्यामुळे २५ वर्षीय अष्टपैलू गुरकिरतला कसोटी संघात स्थान पटकावण्याची संधी मिळाली आहे.
मोहाली कसोटी सामन्यात मैदानावर ड्रिंक्सदरम्यान दिसणाऱ्या गुरकिरतला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या १७ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आलेले आहे. गुरकिरतला स्थानिक क्रिकेटमधील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्याची संधी मिळाली आहे. (वृत्तसंस्था)