आयर्लंडचा यूएईवर रोमहर्षक विजय
By Admin | Updated: February 26, 2015 01:00 IST2015-02-26T01:00:46+5:302015-02-26T01:00:46+5:30
गॅरी विल्सन आणि केविन ओ ब्रायन यांनी योग्य वेळी अर्धशतके झळकावून विश्वचषकातील ब गटाच्या सामन्यात बुधवारी आयर्लंडला यूएईवर दोन गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदवून दिला.

आयर्लंडचा यूएईवर रोमहर्षक विजय
ब्रिस्बेन : गॅरी विल्सन आणि केविन ओ ब्रायन यांनी योग्य वेळी अर्धशतके झळकावून विश्वचषकातील ब गटाच्या सामन्यात बुधवारी आयर्लंडला यूएईवर दोन गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदवून दिला. यूएईच्या पराभवामुळे शेमान अन्वरचे शतक झाकोळले गेले.
फलंदाजीचे आमंत्रण मिळताच यूएईसाठी अन्वरने १०६ धावा ठोकल्या. विश्वचषकात शतक नोंदविणारा देशाचा तो पहिलाच खेळाडू ठरला. संघाची ६ बाद १३१ अशी पडझड झाल्यानंतर अन्वरने अमजद जावेदसोबत (४२) सातव्या गड्यासाठी विक्रमी १०७ धावांची भागीदारी कररून ९ बाद २७८ असा धावसंख्येला आकार दिला.
पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडीजला धूळ चारून सनसनाटी पसरविणाऱ्या आयर्लंडच्या आघाडीच्या फळीने चांगली सुरुवात केली; पण मोठी खेळी करण्यात फलंदाज अपयशी ठरले. २६व्या षटकांत संघाच्या ४ बाद ९७ धावा होत्या. विल्सनने (८०) एक टोक सांभाळले, तर केविन ओ ब्रायनने २५ चेंडू खेळून ८ चौकार व २ षटकारांसह ५० धावा फटकावल्या. यामुळे आयर्लंडला ४९.२ षटकांत ८ बाद २७९ धावा करण्यात यश मिळाले. आयर्लंडचा सलग दुसरा विजय असल्याने ४ गुण झाले आहेत. ब गटात हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. यूएईला सलग दुसऱ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. याआधी हा संघ झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होता.
आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंग (३) झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड ३७ आणि एड जोएस ३७ यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावा केल्या. विल्सन-बालबिर्नी यांनी पाचव्या तसेच विल्सन- केविन ओ ब्रायन यांनी सहाव्या गड्यासाठी क्रमश: ७२ आणि ७४ धावा ठोकून संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या १० षटकांत संघाला ९५ धावांची गरज होती. त्याच वेळी ओब्रायनने झंझावाती फलंदाजी करून सामना खेचून नेला.
त्याआधी यूएईकडून अमजद अली ४५, खुर्रम खान ३६ यांनी चांगली सुरुवात केली. अन्वरने ७९ चेंडूंत १० चौकार व एका षटकारांच्या साह्याने शतक गाठले. १०६ धावा काढून तो झेलबाद झाला.(वृत्तसंस्था)