‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयर्लंड संघाने विश्वकप स्पर्धेत यावेळीही आपली प्रतिमा कायम राखली. दिग्गज संघांचा पराभव करण्याची क्षमता असलेल्या आयर्लंड संघाने या स्पर्धेत सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला पराभवाचा तडाखा देत, आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा इशारा दिला. यापूर्वी,आयर्लंड संघाने विश्वकप स्पर्धेत २००७ मध्ये पाकिस्तानचा, तर २०११ मध्ये इंग्लंडचा पराभव करण्याचा पराक्रम केला आहे. यावेळी या यादीत वेस्ट इंडिजचे नाव जोडले गेले. असोसिएट संघांमध्ये आयर्लंडला सर्वांत वरचे स्थान आहे. पॉल स्टर्लिंग : कौंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या पॉल स्टर्लिंगने ९२ धावांची खेळी करीत आयर्लंडच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. स्टर्लिंगने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.एड जॉयस : असोसिएट संघाचे प्रतिनिधित्व करीत असलो तरी प्रतिभा असल्याचे एड जॉयसने सिद्ध केले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दडपण न बाळगता नैसर्गिक खेळी करणे उपयुक्त ठरत असल्याचे जॉयसने सिद्ध केले. त्याने ८४ धावांची खेळी केली. त्याने स्टर्लिंगसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. नील ओब्रायन : नील ओब्रायनने ६० चेंडूंत नाबाद ७९ धावांची खेळी करीत संघाला लक्ष्य गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नीलच्या खेळीमध्ये ११ चौकारांचा समावेश आहे.