आयर्लंड यूएईविरुद्ध विजयासाठी उत्सुक

By Admin | Updated: February 25, 2015 04:30 IST2015-02-25T01:30:17+5:302015-02-25T04:30:31+5:30

वेस्ट इंडिजविरुद्ध धक्कादायक निकाल नोंदविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या आयर्लंड संघाला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटात बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यूएई

Ireland eager to win against UAE | आयर्लंड यूएईविरुद्ध विजयासाठी उत्सुक

आयर्लंड यूएईविरुद्ध विजयासाठी उत्सुक

ब्रिस्बेन : वेस्ट इंडिजविरुद्ध धक्कादायक निकाल नोंदविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या आयर्लंड संघाला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटात बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यूएई (संयुक्त अरब अमिरात) संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आयर्लंड संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
गॅबामध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीत यूएईविरुद्ध विजय मिळविण्यात अपयश आले तर वेस्ट इंडिजविरुद्ध मिळविलेल्या विजयाला काहीच अर्थ उरणार नाही, असे आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनने संघसहकाऱ्यांना सांगितले आहे. असोसिएट संघाविरुद्ध विजय मिळविला तर आयर्लंड संघाची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची शक्यता बळावेल. आयर्लंड संघाने सलामीला विश्वकप स्पर्धेत दोनदा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या विंडीज संघाचा पराभव केला होता. आयर्लंड संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.
आयर्लंड संघाचे अनेक सदस्य इंग्लिश कौंटी संघांचे प्रतिनिधित्व करतात. त्यात मिडलसेक्सतर्फे खेळणारा पॉल स्टर्लिंग आणि ससेक्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅड जोएस यांचा समावेश आहे. स्टर्लिंग व जोएस यांनी विंडीजविरुद्धच्या लढतीत अनुक्रमे ९२ व ८४ धावा फटकावित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या लढतीत सॉमरसेटचा फिरकीपटू जॉर्ज डाकरेलने ५० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले होते.
आयर्लंड व यूएई संघ आयसीसीच्या छोट्या स्पर्धांमध्ये अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. अष्टपैलू ओब्रायन यूएई संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला आहे. ‘ब’ गटातील एक सामन्यात यूएई संघाने झिम्बाब्वेविरुद्ध संघर्षपूर्ण खेळ केला होता. झिम्बाब्वेने त्या लढतीत ४ गड्यांनी विजय मिळविला होता.
ओब्रायन म्हणाला, ‘‘यूएई संघाने झिम्बाब्वेविरुद्ध संघर्षपूर्ण खेळ केला. सीन विलियम्सन व क्रेग इर्विन यांच्या चमकदार फलंदाजीमुळे झिम्बाब्वे संघाला विजय मिळविता आला.’’
यूएई संघाच्या मधल्या फळीत काही चांगले फलंदाज आहेत. त्यात खुर्रम खान व स्वप्नील पाटील
यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याव्यतिरिक्त फिरकीपटू प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत. भारत व पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या बऱ्याच खेळाडूंचा यूएई संघात समावेश आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत
चांगली कामगिरी केल्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे, अशी प्रतिक्रिया यूएई संघाचा कर्णधार मोहम्मद तौकिरने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Ireland eager to win against UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.