आयपीएल स्पॉट फिक्सिंग : श्रीसंतसह सर्व खेळाडू दोषमुक्त
By Admin | Updated: July 25, 2015 17:26 IST2015-07-25T16:56:02+5:302015-07-25T17:26:54+5:30
आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग : श्रीसंतसह सर्व खेळाडू दोषमुक्त
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पुरेशा पुराव्यांअभावी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्या तिघांना दोषमुक्त केले आहे. पतियाळा हाऊस कोर्टामध्ये या प्रकरणाची आज दुपारी सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय झाला.
आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंग करण्याच्या आरोपाखाली मे २०१३मध्ये अटक केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी या तीन क्रिकेटपटूंविरुद्ध तांत्रिक आधारावर न्यायालयात अद्याप आरोप निश्चित होऊ शकले नाहीत.
दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबर २०१३मध्ये श्रीसंत व चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घातली, तर चंदिलाचे प्रकरण बोर्डाच्या शिस्तपालन समितीकडे अद्याप प्रलंबित आहे.
श्रीसंत व चव्हाण यांना या प्रकरणात १० जून २०१३ रोजी जामीन मिळाला, तर चंदिलाने आणखी तीन महिने तुरुंगात घालविले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर श्रीसंत विवाहबंधनात अडकला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्ण यांनी गेल्या २३ मे रोजी या प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी २९ जूनची तारीख दिली होती आणि आरोपींच्या वकिलांना ६ जूनपर्यंत लेखी युक्तिवाद देण्यास सांगितले होते. या प्रकरणात या तीन क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकील यांच्यावरही आरोप आहेत. दिल्ली पोलीस विभागाच्या विशेष शाखेने आरोपपत्रात ४२ जणांना आरोपी केले होते. त्यांत ६ फरारी आरोपींचा समावेश आहे.