लखनौमध्ये आयपीएल शक्य : शुक्ला
By Admin | Updated: April 19, 2017 01:48 IST2017-04-19T01:48:03+5:302017-04-19T01:48:03+5:30
कानपूरच्या ग्रीन पार्कनंतर आता लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांचे आयोजन शक्य आहे.

लखनौमध्ये आयपीएल शक्य : शुक्ला
कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्कनंतर आता लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांचे आयोजन शक्य आहे. त्यासाठी इकाना स्टेडियम आणि यूपीसीए यांच्यादरम्यान करारावर स्वाक्षरी झाली आहे.
आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले की,‘आयपीएलमध्ये मोठा बदल होणार आहे. महसूल वाटपाच्या मुद्यावर आयपीएलचे आयोजन होईल.’ आयपीएलच्या पुढील सत्रात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे पुनरागमन होईल. सध्या खेळत असलेल्या गुजरात लायन्स व रायजिंग पुणे सुपर जायंट या संघांबाबतचा निर्णय आयपीएल कमेटीच्या बैठकीमध्ये होईल. तसे बघता हे दोन संघ केवळ दोन वर्षांसाठीच होते. भविष्यात गुजरात व पुणे संघ खेळतील किंवा नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
शुक्ला यांनी मंगळवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये १० व १३ मे रोजी होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तयारीचा आढावा घेतला. गुजरात लायन्सने राजकोटनंतर ग्रीन पार्कची दुहेरी गृहमैदान म्हणून निवड केली आहे.
शुक्ला पुढे म्हणाले,‘आता कानपूरसोबतच लखनौच्या क्रिकेट चाहत्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. कारण लखनौमध्ये इकाना स्टेडियमचे बांधकाम झपाट्याने होते आहे. त्याची प्रेक्षक क्षमता ५० हजार राहणार आहे. या स्टेडियममध्ये अत्याधुनिक सोईसुविधा राहतील. स्टेडियम तयार झाल्यानंतर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलचे सामनेही होतील, पण त्यामुळे ग्रीन पार्कवर होणाऱ्या सामन्यांवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. कारण ते जुने व ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम असून त्याची आंतरराष्ट्रीय वर्तुळात ओळख आहे.’
आयपीएलच्या पुढच्या सत्रात अनेक बदल होणार आहेत. आता आयपीएल महसूल शेअरिंगच्या आधारावर काम करेल. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांचे पुनरागमन होणार असून खेळाडूंचा लिलाव मोठ्या पातळीवर होणार आहे. खेळाडूंनाही आपला संघ बदलण्याचा व सोडण्याचा अधिकार राहील. आयपीएलचे अकरावे पर्व नवी सुरुवात राहणार आहे. गुजरात लायन्स व पुणे सुपर जायंट या संघांबाबतचा निर्णय समितीच्या बैठकीमध्ये होईल. ’
गुजरात लायन्सचा संघ बाहेर झाला तर ग्रीन पार्कमध्ये पुढील वर्षी आयपीएलचे सामने होणार नाहीत का, याबाबत बोलताना शुक्ला म्हणाले, किंग्स इलेव्हन पंजाबची मालकिन अभिनेत्री प्रीटी झिंटा कानपूरला आपले दुसरे गृहमैदान बनविण्यासाठी तयार आहे.
कानपूरमध्ये जर फाईव्ह स्टार हॉटेलची उणीव नसती तर येथे अनेक आयपीएल संघांची सामने आयोजित करण्याची तयारी होती. लखनौचे स्टेडियम सज्ज झाले म्हणजे तेथे आयपीएलचे अनेक सामने होऊ शकतात. कारण तेथे अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत, असेही शुक्ला यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)