आयपीएल फायनल बंगळुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 03:33 IST2016-04-16T03:33:57+5:302016-04-16T03:33:57+5:30

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील आयपीएलचे १३ सामने ‘शिफ्ट’ करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर यंदाच्या सत्राचा अंतिम सामना आता बंगळुरु येथे होईल. याशिवाय पुणे सुपर

IPL final Bangalore | आयपीएल फायनल बंगळुरात

आयपीएल फायनल बंगळुरात

नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील आयपीएलचे १३ सामने ‘शिफ्ट’ करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर यंदाच्या सत्राचा अंतिम सामना आता बंगळुरु येथे होईल. याशिवाय पुणे सुपर जॉयन्टस् आणि मुंबई इंडियन्स यांचे होम ग्राऊंड म्हणून वैकल्पिक स्थळ निवडण्याचा पर्याय देण्यात आला.
आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पुणे आणि मुंबई संघांच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत आयपीएल फायनल आणि पहिला क्वालिफायर बंगळुरु येथे आयोजित करण्याचा निर्णय झाला. दुसरा क्वालिफायर आणि एलिमिनेटर कोलकाता येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. बैठकीत पुणे व मुंबईला होम ग्राऊंडसाठी रायपूर, जयपूर, विशाखापट्टणम आणि कानपूरचा प्रस्ताव देण्यात आला. पुणे संघाने विशाखापट्टणमची निवड केली. मुंबई इंडियन्सने विचार करण्यास दोन दिवसांचा वेळ मागितला आहे.
बैठकीची माहिती देताना शुक्ला म्हणाले, ‘फायनल व पहिला क्वालिफायर बंगळुरुत तसेच दुसरा क्वालिफायर आणि एलिमिनेटर कोलकाता येथे करण्याचा प्रस्ताव आम्ही संचालन परिषदेपुढे ठेवणार आहोत. पुणे व मुंबईसोबत चर्चेनंतर आम्ही चार पर्याय ठेवले. पुणे संघाने एक पर्याय निवडला तर मुंबईने परवापर्यंत वेळ मागितला आहे. ’
पुणे आणि मुंबई फ्रेन्चायसींनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दुष्काळग्रस्तांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही कोर्टाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रातील आयपीएल सामने स्थानांतरित करण्याचा आदेश दिल्याने पर्यायी स्थळ निवडण्याचे संकट आले आहे. पाच कोटी जमा करण्यासाठी न्यायालयाने फ्रेन्चायसींना लेखी आदेश दिले तरच ही रक्कम जमा करता येईल, असे शुक्ला यांनी सांगितले. पुण्यात १ मे रोजी पुणे- मुंबई या सामन्याचे आयोजन होणार आहे. पण त्याआधी पुण्याचा संघ पुण्यातच २९ एप्रिल रोजी आणखी एक सामना खेळेल. त्यामुळे १ मे रोजीचा सामना पुण्यात आयोजित करण्याची विनंती बीसीसीआय न्यायालयाला करेल, असे शुक्ला म्हणाले. राजस्थान क्रिकेट संघटनेला गटबाजीमुळे बीसीसीआयमधून निलंबित केले असले तरी राज्य सरकारच्या विनंतीनुसार जयपूर हे स्थळ आयपीएलसाठी उपलब्ध असेल. स्टेडियम सरकारच्या मालकीचे असल्याने ते वापरण्याचा अधिकारही सरकारकडे आहे.

पुण्यातील सामने विशाखापट्टनममध्ये!
त्याआधी बीसीसीआयने बुधवारी न्यायालयापुढे ताठर भूमिका घेत स्पर्धा मध्येच स्थानांतरित करणे शक्य नसल्याचे म्हटले होते. मुंबई, पुणे आणि नागपुरात आयपीएल सामन्यांचे आयोजन होणार होते पण खेळपट्टीच्या देखभालीवर शेकडो लिटर पाण्याचा होत असलेला अपव्यय रोखण्याची विनंती करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या राज्यातील जलसाठ्याची अशी नासाडी करता येणार नाही, असे न्यायालयाने याचिकेवर सुनावणीदरम्यान बजावले.

दुष्काळग्रस्त भागात आम्ही पाणी पुरविण्यासाठी सहकार्य करू, असे वचन देत जेथे सामने आहेत तेथेही पिण्याचे पाणी वापरणार नाही, अशी ग्वाही बीसीसीआयने दिली, पण कोर्टाचे समाधान झाले नव्हते. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी लीगबाबत नकारात्मक प्रचाराचा हा भाग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. किती फाईव्ह स्टार्स हॉटेलचे स्विमिंग पूल बंद करण्यात आले आणि किती लोकांनी स्वत:च्या लॉनला पाणी देणे थांबविले, असा संतप्त सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला होता.

Web Title: IPL final Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.