दालमियांच्या अनुपस्थितीत आयपीएल

By Admin | Updated: July 19, 2015 01:01 IST2015-07-19T01:01:21+5:302015-07-19T01:01:21+5:30

स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे संकटात सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीग संचालन परिषदेची रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

IPL in absence of Dalmiya | दालमियांच्या अनुपस्थितीत आयपीएल

दालमियांच्या अनुपस्थितीत आयपीएल

मुंबई : स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे संकटात सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीग संचालन परिषदेची रविवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राजस्थान आणि चेन्नई संघावरील निलंबनावर चर्चा, तसेच आयपीएलबाबत नवे धोरण आखण्यासाठी बोलविण्यात येणाऱ्या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष खुद्द जगमोहन दालमिया उपस्थित राहणार नसल्याने तर्कवितर्कांना पेव फुटले आहे.
राजीव शुक्ला यांच्या मार्गदर्शनात ही बैठक होईल. त्यात लोढा समितीने उपस्थित केलेल्या सर्व पैलूंवर चर्चा होणार आहे. चेन्नई, तसेच राजस्थानला त्यांचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन, तसेच राज कुंद्रा हे फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कुंद्रा आणि मयप्पन यांच्यावर आजन्म बंदी घातल्यानंतर आयपीएल
संचालन परिषदेला असे गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे नवे धोरण आखावे लागणार आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेवरदेखील चर्चा होणार आहे.
राजीव शुक्ला यांनी यंदा आठ संघांसह लीग आणखी लोकप्रिय ठरेल, असा विश्वास नुकताच व्यक्त केला होता. याशिवाय दोन्ही संघांना बीसीसीआयच्या नियंत्रणाखाली खेळविण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. या पर्यायांवरदेखील बैठकीत विचार केला जाईल.
सट्टेबाजी व स्पॉट फिक्सिंगप्रकरणी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे प्रमुख न्या. मुकुल मुदगल यांनी एका मुलाखतीत ‘दोन नव्या संघांना कायदेशीर निविदा काढून जोडले जाऊ शकते. या संघात निलंबित चेन्नई आणि राजस्थानच्या खेळाडूंना लोन (फुटबॉल शैलीत)वर घेता येईल असे म्हटले होते. हे संघ दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुन्हा स्वत:च्या मूळ संघात परत जाऊ शकतात.

Web Title: IPL in absence of Dalmiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.