IPL 10 : पुण्याचा धोनीला दे धक्का, कर्णधारपदावरून हटवलं
By Admin | Updated: February 19, 2017 15:23 IST2017-02-19T13:55:16+5:302017-02-19T15:23:43+5:30
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सने कर्णधारपदावरून हटवलं

IPL 10 : पुण्याचा धोनीला दे धक्का, कर्णधारपदावरून हटवलं
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सने कर्णधारपदावरून हटवलं आहे. धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 9 व्या सत्रात धोनीने पुण्याचं कर्णधारपद सांभाळलं होतं. धोनीच्या कर्णधारापदाखाली संघाच्या कामगिरीवर पुणे संघाच्या व्यवस्थापकीय समिती नाराज असल्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं वृत्त आहे. गेल्या वर्षी 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळेच धोनीची कर्णधारपदावरून गच्छंती केल्याचं बोललं जात आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून धोनी संघासोबत कायम असणार आहे.
यापूर्वी स्टिव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र, या दोन्ही संघांवर मॅच फिक्सिंग प्रकरणामुळं बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.