प्रो-बॉक्सिंगमध्ये होणार शंभर कोटींची गुंतवणूक
By Admin | Updated: November 17, 2016 02:07 IST2016-11-17T02:07:13+5:302016-11-17T02:07:13+5:30
देशात प्रो-बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय बॉक्सिंग परिषदेने (आयबीसी) स्पोर्टी सोल्युशन्ससोबत करार केला आहे.

प्रो-बॉक्सिंगमध्ये होणार शंभर कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली : देशात प्रो-बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय बॉक्सिंग परिषदेने (आयबीसी) स्पोर्टी सोल्युशन्ससोबत करार केला आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षांत शंभर कोटींची गुंतवणूक केली जाईल.
या कराराचा हेतू देशात प्रो-बॉक्सिंगचा प्रसार आणि प्रचार करणे, तसेच पायाभूत सुविधांची उभारणी हा असेल. याशिवाय पुढील पाच वर्षांत बॉक्सिंगमध्ये भारताला विश्वस्तरावर लौकिक मिळवून देणे हादेखील हेतू असेल.
या उपायांमुळे भारतात बॉक्सिंगची बाजारपेठदेखील निर्माण होण्यास मदत होईल. असे झाल्यास बॉक्सर्सकडे लढती खेळणे आणि
पैसा कमविणे हा पर्याय उपलब्ध होईल. करारांतर्गत आयबीसी- स्पोर्टी सोल्युशन्स हे पुढील वर्षी जानेवारीत सुरू होत असलेल्या पहिल्या आयबीसी फाईट नाईट कार्ड स्पर्धेवर कोट्यवधींचा खर्च करणार आहेत. (वृत्तसंस्था)
यावेळी उपस्थित असलेले आयबीसीचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुरलीधर राजा म्हणाले,‘या करारामुळे देशात प्रो-बॉक्सिंगला नवी ऊर्जा मिळणार आहे. देशात प्रो- बॉक्सिंगच्या विकासासाठी आम्हाला योग्य पार्टनरची गरज होती. स्पोर्टी सोल्युशन्सला खेळातील व्यापाराचा दीर्घानुभव आहे. या करारामुळे भारत विश्व स्तरावर बॉक्सिंगची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येईल, अशी आशा आहे.’
स्पोर्टीचे सीईओ आशिष चढ्ढा म्हणाले, ‘व्यावसायिक बॉक्सिंग शानदार खेळ आहे. यात उतरण्याचा आमचा हेतू देशाला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवून देणे हाच आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर पैशाचे स्रोत उत्पन्न करावे लागेल. या करारामुळे प्रो-बॉक्सिंगसाठी सर्व स्तरावर कोचेसचा लवकरच शोध घेतला जाईल.’(वृत्तसंस्था)