कसोटी क्रिकेट संपविण्याचे कारस्थान
By Admin | Updated: November 29, 2015 01:29 IST2015-11-29T01:29:41+5:302015-11-29T01:29:41+5:30
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय

कसोटी क्रिकेट संपविण्याचे कारस्थान
नवी दिल्ली : व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय अशा खेळपट्टीची मागणी करणारा कर्णधार विराट कोहली आणि विकेट तयार करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही, या शब्दांत धारेवर धरले आहे.
भारत-द. आफ्रिका यांच्यात शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. स्थानिक संघाला लाभ देण्याच्या हेतूने ती तयार करण्यात आल्याचे वक्तव्य करीत बेदी म्हणाले, ‘चांगल्या आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आणि विशेष प्रकारच्या मातीची गरज असते; पण येथे काहीही करण्याची गरज भासली नाही. नागपुरात केवळ विकेट बनवायची म्हणून बनविण्यात आली.’ द. आफ्रिका संघाच्या पडझडीनंतर क्रिकेटविश्वात या खेळपट्टीवर अनेक सवाल उपस्थित झाले होते.
अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटला संपविण्यास पूरक असल्याची टीका करीत ६९ वर्षांचे बेदी पुढे म्हणाले, ‘भारताने द. आफ्रिकेला पराभूत केले, पण त्यात काय अर्थ आहे. आयपीएलने कसोटी क्रिकेटला संपविले. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीला पूर्णपणे संपवीत आहेत. नागपूर कसोटी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे सामन्याचे समालोचक होते. स्वत: भारताचा दुसरा डाव
१७३ धावांत आटोपला याचा अर्थ काय!’
सामन्यात १२ गडी बाद करणारा रविचंद्रन अश्विन याच्याबद्दल बेदी म्हणाले, ‘अश्विन परिपक्वगोलंदाज असल्याने त्याला बळी घेण्यासाठी अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांची गरज नाही. अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही अश्विनची प्रतिभा संपवीत आहात. रवींद्र जडेजाला अशा खेळपट्ट्यांची गरज असेल; पण अश्विनला मुळीच नाही.’ कारकिर्दीत ६७ कसोटी आणि दहा वन-डे सामन्यांत डावखुरे फिरकीपटू बेदी यांनी दोन्ही प्रकारांत २७३ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)
मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही. डग्लस जॉर्डिन याने १९३२-३३ मध्ये बॉडी लाईन गोलंदाजी आणली. क्रिकेटविश्वाला त्याला उत्तर देणे भाग पडले. कोहलीला देखील असेच उत्तर द्यावे लागेल. आम्ही कसोटी क्रिकेट संपवीत आहोत. पडद्यामागे ज्यांची यात भूमिका आहे, त्यात कोहलीदेखील तितकाच जबाबदार ठरतो.
- बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार