आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक येणार
By Admin | Updated: September 9, 2014 03:46 IST2014-09-09T03:46:54+5:302014-09-09T03:46:54+5:30
२0१२ ला बॉक्सिंग महासंघाला निलंबित केल्यानंतर या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बॉक्सिंचा कारभार पाहण्यासाठी बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक येणार
नवी दिल्ली : भारतात नवीन बॉक्सिंग महासंघ स्थापन करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. वादग्रस्त ठरलेल्या आणि चारवेळा चालढकल झालेल्या या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचा (एआयबीए) पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहे.
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २0१२ ला बॉक्सिंग महासंघाला निलंबित केल्यानंतर या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बॉक्सिंचा कारभार पाहण्यासाठी बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यात आली होती. बॉक्सिंग इंडियाच्या बॅनरखाली ही निवडणूक होत आहे.
बॉक्सिंग इंडियाचे सदस्य उदित सेठ म्हणाले, 'एआयबीएच्या कायदेशीर विभाग सांभाळणार्या क्लियोधना गॉय या ११ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार्या निवडणुकीवर लक्ष ठेवतील. त्या निवडणूक प्रक्रियेचा अहवाल तयार करणार असून आणि संपूर्ण हालचालीचे व्हिडिओ चित्रण करणार आहेत. सर्वच राष्ट्रीय महासंघांच्या निवडणुका आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत होतात. मतदान गुप्त पद्धतीने होणार असून, त्याचे व्हिडिओ चित्रण केले जाईल. निवडणूक अधिकारी हे उच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश आहेत. पारदश्रीपणा राखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत.'
याशिवाय बॉक्सिंग इंडियाने क्रीडा मंत्र्यांनादेखील एक पर्यवेक्षक पाठविण्याची विनंती केली. एक अधिकारी म्हणाला, 'गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे क्रीडा मंत्रालयाचा प्रतिनिधी बोलविण्यात आला आहे.
आधी निवडणूक ९ जुलै रोजी होणार होती. पण अनेक राज्यांनी बॉक्सिंग इंडियाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्याने निवडणूक लांबणीवर पडली. बॉक्सिंग इंडिया माजी प्रशासकीय आधिकारी आणि कॉर्पोरेट जगतातील लोकांचा गट आहे. भारतीय बॉक्सिंगचे प्रायोजक मोनेट इस्पातचे चेअरमन संदीप जाजोदिया हे अध्यक्षपदी आधीच बिनविरोध निर्वाचित झाले आहेत. (वृत्तसंस्था)