पाक फलंदाजीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक
By Admin | Updated: March 3, 2015 23:44 IST2015-03-03T23:44:56+5:302015-03-03T23:44:56+5:30
विश्वकप क्रिकेट स्पर्धेत यूएईविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पाकिस्तान संघ नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

पाक फलंदाजीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक
नेपियर : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत यूएईविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पाकिस्तान संघ नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. पाकिस्तान संघ या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तान संघाला विश्वकप स्पर्धेत फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्ध पहिल्या लढतीत ७६ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाला त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध १५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. येथे १९९२ मध्ये विश्वविजेतेपदचा मान मिळविणाऱ्या पाकिस्तान संघाने या वेळी एकमेव विजय रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मिळविला आहे. त्या लढतीत पाकिस्तान संघ केवळ २० धावांनी विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक म्हणाला होता,‘‘यानंतर प्रत्येक लढत आमच्यासाठी बाद फेरीप्रमाणे आहे. आघाडीच्या फळीकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.’’
पाकिस्तान संघाने युनिस खानला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, पण हा निर्णय चुकीचा ठरला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरुवातीला चार फलंदाज केवळ १ धावेमध्ये तंबूत परतले होते. झिम्बाब्वेविरुद्धही त्यांची २ बाद ४ अशी अवस्था झाली होती. तीन सामने खेळणाऱ्या पाकिस्तानच्या खात्यावर २ गुणांची नोंद आहे. बाद फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानसह वेस्ट इंडीज व आयर्लंड संघांदरम्यान चुरस आहे. दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पाक संघाचा नेट रनरेट (-१.३७) मायनसमध्ये आहे. त्यांना नेट रनरेटमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. युएईसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पाकिस्तान लेग स्पिनर यासिर शाह याला संधी देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नासिर जमशेदच्या स्थानी सलामीवीर म्हणून सरफराज अहमदला संधी देण्याचे संकेत मिळत आहेत.(वृत्तसंस्था)