सेफ्रोविकचा निर्णायक गोल : स्वीत्झर्लंडची इक्वाडोरवर २-१ ने मातब्रासिलिया : अखेरच्या क्षणी इंज्युरी टाईममध्ये हॅरिस सेफ्रोविकने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी ग्रुप ‘ई’च्या सामन्यात इक्वाडोरचा २-१ ने पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला स्वित्झर्लंड संघ मध्यंतरापर्यंत ०-१ ने पिछाडीवर होता. अॅदमिर मेहमेदीने ४८ व्या मिनिटाला तर सेफ्रोविकने (९०+३) इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदवित संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बदली खेळाडू म्हणून मैदानात दाखल झालेल्या मेहमेदीने केवळ १२१ सेकंदामध्ये गोल नोंदविला. हा सामना अनिर्णीत राहिल असे वाटत होते, पण सेफ्रोविकने अखेरच्या क्षणी गोल नोंदवित स्वित्झर्लंडला तीन गुणांची कमाई करुन दिली. दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्वित्झर्लंड संघाने विश्वकप स्पर्धेत प्रथमच विजयाची चव चाखली. यापूर्वी त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याआधी, फ्री किकवर इनेर व्हेलेंसियाने हेडरद्वारे गोल नोंदवित इक्वाडोरला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. व्हेलेंसियाने २२ व्या मिनिटाला वाल्टर अयोव्हीच्या फ्री किकवर हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला, पण इक्वाडोर संघाला सामन्याच्या दुसऱ्या सत्रात वर्चस्व गाजविण्यात अपयश आले. मध्यंतरापूर्वी स्वित्झर्लंडतर्फे शेरडन शाकिरीचा गोल नोंदविण्याचा प्रयत्न इक्वाडोरचा गोलकिपर अॅलेक्झॅन्डर डोमिनुएजने हाणून पाडला. (वृत्तसंस्था)
इंज्युरी टाईममध्ये सामना जिंकला!
By admin | Updated: June 16, 2014 13:24 IST