भारत-पाकिस्तान मालिका लंकेत!
By Admin | Updated: November 27, 2015 03:32 IST2015-11-27T03:32:23+5:302015-11-27T03:32:23+5:30
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली

भारत-पाकिस्तान मालिका लंकेत!
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईत सात वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच २६/११लाच हा निर्णय झाला, हे विशेष म्हणावे लागेल.
लक्षणीय म्हणजे या मालिकेच्या आयोजनाविषयी अंतिम निर्णय होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील श्रीलंकेत या मालिकेच्या आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, ‘भारत-पाक क्रिकेट मालिका अंदाजे १५ डिसेंबरपासून खेळविण्यात येईल. ही मालिका पाच सामन्यांची असेल. या निर्णयावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून, यामुळे संबंध मजबूत होतील. या मालिकेच्या माध्यमातूनच पुन्हा या दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधाची सुरुवात होईल.’ २००७ सालानंतर या दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका झालेली नसून २००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत - पाक यांच्यातील क्रिकेट संबंध थांबले होते.
नियोजित कार्यक्रमानुसार भारत - पाकिस्तान मालिकेमध्ये २ ‘कसोटी’,
५ ‘एकदिवसीय’ आणि २ ‘टी-२०’ सामने खेळविण्यात येणार होते. मात्र वेळेअभावी केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे.
आम्हाला भारतात खेळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. हे पूर्णपणे संघावर अवलंबून आहे की ते दबावाला कसे सामोरे जातात. आम्हाला भारतात खूप प्रेम मिळाले असून, त्यांना आम्हाला खेळताना पाहायचे आहे.
- शाहिद आफ्रिदी,
पाक क्रिकेटपटू
मालिका खेळवली जात आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत - पाक मालिका पुन्हा सुरू होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध खेळणे हे क्रिकेटच्या हिताचे आहे.
- वसिम अक्रम,
माजी क्रिकेटपटू, पाक