भारत-ब्रिटन आमनेसामने
By Admin | Updated: July 5, 2015 01:15 IST2015-07-05T01:15:57+5:302015-07-05T01:15:57+5:30
यजमान बेल्जियमकडून सेमीफायनलमध्ये 0-४ ने मोठा पराभव झाल्यानंतर भारत हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलच्या कास्यपदकावर कब्जा करण्यासाठी ब्रिटनशी दोन हात करील तेव्हा

भारत-ब्रिटन आमनेसामने
एंटवर्प : यजमान बेल्जियमकडून सेमीफायनलमध्ये 0-४ ने मोठा पराभव झाल्यानंतर भारत हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलच्या कास्यपदकावर कब्जा करण्यासाठी ब्रिटनशी दोन हात करील तेव्हा त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर असणार आहे. सरदारसिंह याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एफआयएच क्रमवारीत ब्रिटनपासून चार स्थानांनी खाली आहे. ब्रिटनला वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने ३-१ ने पराभूत केले होत. काही वेळाच आॅस्ट्रेलियन स्ट्रायकर ब्रिटिश बचावफळी भेदू शकले होते.
या सामन्यात भारत गेल्या पराभवातून स्वत:ला सावरू शकतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारत बेल्जियमकडून एकतर्फी सामन्यात पराभूत झाला व हीच चिंतेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील लढत बरोबरीची होत असे आणि एखाद-दोन गोलच्या अंतराने सामन्याचा निकाल लागायचा. आता कांस्यपदक जिंकण्यासाठी भारतीय संघाला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक पॉल वॉन ऐस म्हणाले, ‘आम्हाला ब्रिटनविरुद्ध चांगले खेळावे लागणार आहे. आम्हाला जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवावा लागेल आणि झुंज न देता हा सामना आपल्या हातून जाऊ द्यायला नको याकडे लक्ष द्यावे लागेल.’ ब्रिटन संघ चांगलाच तुल्यबळ आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या लढतीत निर्णायक क्षणी केलेल्या गोलच्या बळावर त्यांनी भारताला २-१ असे एका गोलने पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)