भारताची विजयी घोडदौड कायम
By Admin | Updated: February 8, 2017 00:34 IST2017-02-08T00:34:12+5:302017-02-08T00:34:12+5:30
यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना न्यूझीलंड संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला

भारताची विजयी घोडदौड कायम
भुवनेश्वर : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना न्यूझीलंड संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. अजयकुमार रेड्डीचे शानदार अर्धशतक भारताच्या विजयात लक्षवेधी ठरले.
केआयआयटी मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव भारतीयांनी ६ बाद १३६ धावांमध्ये रोखला. इक्बाल जाफर (२/१९) आणि केतन पटेल (१/१२) यांनी अचूक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. तसेच, बी. डी. विल्सन (५१ चेंडूत ५२ धावा) याने एकाकी झुंज दिल्याने न्यूझीलंडला समाधानकारक मजल मारण्यात यश आले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केवळ ९ षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात १४० धावा फटकावल्या. अजयकुमार रेड्डीने केवळ २८ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ७५ धावांचा तडाखा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, सुखराम माजीनेदेखील २५ चेंडूंत ११ चौकारांसह ५६ धावांची धमाकेदार खेळी करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
अन्य लढतीत, पाकिस्तानने दणदणीत विजयासह आगेकूच करताना बांगलादेशचा १५१ धावांनी पराभव केला. तसेच, वेस्ट इंडिजनेही विजयी कूच करताना डेनेल शिमच्या (१३१ धावा) चमकदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला ६५ धावांनी धक्का दिला.
(वृत्तसंस्था)