भारताची विजयी आघाडी
By Admin | Updated: October 4, 2016 03:32 IST2016-10-04T03:32:40+5:302016-10-04T03:32:40+5:30
भारताने सोमवारी ईडन गार्डनवर शानदार कामगिरी करीत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा १७८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली

भारताची विजयी आघाडी
कोलकाता : भारताने सोमवारी ईडन गार्डनवर शानदार कामगिरी करीत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा १७८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या निकालाच्या आधारावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पिछाडीवर सोडत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने मायदेशात भारताच्या २५० व्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३७६ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने सुरुवातीला शानदार खेळ केला, पण चहापानानंतर संघाचा डाव गडगडला. न्यूझीलंडचा दुसरा डाव ८१.१ षटकांत १९७ धावांत संपुष्टात आला. दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
त्याआधी, टीम इंडियाने दुसऱ्या डावात २६३ धावांची मजल मारली. रोहित शर्माने रविवारी ८२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर रिद्धिमान साहाने १२० चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावांची खेळी करीत या लढतीत सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची दिवसाच्या अखेरच्या सत्रात घसरगुंडी उडाली. त्यांनी या सत्रात सात विकेट गमावल्या. न्यूझीलंडतर्फे दुसऱ्या डावात सलामीवीर टॉम लॅथम (७४) सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरला. त्याच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश आहे.
लॅथमच्या खेळीमुळे न्यूझीलंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने चहापानानंतर दुसऱ्या षटकात त्या आशेवर पाणी फेरले. चहापानानंतर लॅथम आश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक साहाकडे झेल देत माघारी परतला. लॅथम व्यतिरिक्त ल्यूक रोंचीने ६० चेंडूंमध्ये ३२ धावांची खेळी केली. त्यात चार चौकारांचा समावेश आहे. न्यूझीलंडचे अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले. भारतातर्फे आश्विन, जडेजा व शमी यांनी अनुक्रमे ८२, ४१ व ४६ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले.
उभय संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना ८ आॅक्टोबरपासून इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांदरम्यान पाच वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग मिळवणाऱ्या शमीने तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. भारताने ८० व्या षटकात नवा चेंडू घेतला. शमीने बाऊंसरवर ट्रेंट बोल्टला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बीसीसीआयकडून अभिनंदन
भारतीय क्रिकेट टीमने आयसीसी कसोटी मानांकनात पुन्हा नंबर वनचे स्थान पटकविले. या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांनी श्रीलंकेत २२ वर्षांनंतर मालिका जिंकत विदेशी भूमीवर प्रभावशाली प्रदर्शन कले. मंडळाचे सचिव अजय शिर्के म्हणाले, मंडळाने कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. भारताने मैदानाबाहेर आणि मैदानावर मान प्राप्त केला आहे. सर्व खेळाडूंच्या मेहनतीचा हा परिणाम आहे.
प्रदीर्घ सत्रामुळे रँकिंग आमच्या नियंत्रणात : कोहली
भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला आनंद झाला आहे. मायदेशात खेळल्या जाणाऱ्या प्रदीर्घ सत्रामुळे आता रँकिंगवर नियंत्रण राखणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने व्यक्त केली. भारताने ईडन गार्डन्सवर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा १७८ धावांनी पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या निकालासह भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला, ‘‘कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य आहे. रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणे आणि गमावणे आमच्या हातात नाही; पण मायदेशातील प्रदीर्घ सत्रामुळे यावर नियंत्रण राखणे शक्य आहे.’’
विराटने यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘साहा याने शानदार कामगिरी केली. तो सध्या देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. विंडीजमध्ये शतक झळकावल्यामुळे त्याचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली.’’
दुखापतग्रस्त धवनच्या जागी करुण नायर
भारताचा सलामीवीर फलंदाज धवनच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध ८ आॅक्टोबरपासून इंदूर येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्याऐवजी कर्नाटकच्या करुण नायरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा चेंडू दोनदा धवनच्या अंगठ्यावर आदळला. त्याच्या अंगठ्याचे स्कॅन करण्यात आले असून, त्याला १५ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उकाडा असताना आमच्या खेळाडूंनी भारतीय संघाला कडवी झुंज दिल्यामुळे समाधानी आहे. आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पण, साहाने दोन्ही डावांत चांगली फलंदाजी करून भारताला वर्चस्व मिळवून दिले. पहिल्या डावात ११२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर आमच्यावर दडपण आले. आम्ही दुसऱ्या डावात सुरुवातीला काही विकेट घेतल्या; पण साहा व रोहित यांनी चमकदार फलंदाजी करून सामना आमच्याकडून हिसकावला. टॉम लॅथमने आज चांगली फलंदाजी केली.- रॉस टेलर, न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार
मालिका विजय निश्चित झाल्यामुळे आणि प्रथमच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यामुळे आनंद झाला. माझ्या संघसहकाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे मला समर्थन लाभले. फलंदाजी करताना माझ्यावर कुठलेही दडपण नव्हते. चांगल्या चेंडूचा आदर केला आणि चुकीच्या चेंडूंना सीमारेषा दाखविली.
-सामनावीर,
रिद्धिमान साहा
धावफलक
भारत पहिला डाव ३१८. न्यूझीलंड पहिला डाव २०४.
भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. गुप्टील गो. हेन्री ०७, शिखर धवन पायचीत गो. बोल्ट १७, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. हेन्री ०४, विराट कोहली पायचीत गो. बोल्ट ४५, अजिंक्य रहाणे झे. बोल्ट गो. हेन्री ०१, रोहित शर्मा झे. रोंची गो. सँटनर ८२, आर. आश्विन पायचीत गो. सँटनर ०५, रिद्धिमान साहा नाबाद ५८, रवींद्र जडेजा झे. नीशाम (बदली खेळाडू) गो. सँटनर ०६, भुवनेश्वर कुमार झे. निकोल्स गो. वॅगनर २३, मोहम्मद शमी झे. लॅथम गो. बोल्ट ०१. अवांतर (१४). एकूण ७६.५ षटकांत सर्व बाद २६३. बाद क्रम : १-१२, २-२४, ३-३४, ४-४३, ५-९१, ६-१०६, ७-२०९, ८-२१५, ९-२५१, १०-२६३. गोलंदाजी : बोल्ट १७.५-६-३८-३, हेन्री २०-२-५९-३, वॅगनर १५-३-४५-१, पटेल ८-०-५०-०, सँटनर १६-२-६०-३.
न्यूझीलंड दुसरा डाव (लक्ष्य : ३७६ धावा) : टॉम लॅथम झे. साहा गो. आश्विन ७४, मार्टिन गुप्टील पायचीत गो. आश्विन २४, हेन्री निकोल्स झे. रहाणे गो. जडेजा २४, रॉस टेलर पायचीत गो. आश्विन ०४, ल्युक रोंची त्रि. गो. जडेजा ३२, मिशेल सँटनर पायचीत गो. शमी ०९, बीजे वॉटलिंग त्रि. गो. शमी ०१, मॅट हेन्री झे. कोहली गो. जडेजा १८, जीतन पटेल त्रि. गो. भुवनेश्वर ०२, नील वॅगनर नाबाद ०५, ट्रेन्ट बोल्ट झे. विजय गो. शमी ०४. अवांतर (०). एकूण ८१.१ षटकांत सर्व बाद १९७. बाद क्रम : १-५५, २-१०४, ३-११५, ४-१४१, ५-१५४, ६-१५६, ७-१७५, ८-१७८, ९-१९०, १०-१९७. गोलंदाजी : भुवनेश्वर १२-४-२८-१, शमी १८.१-५-४६-३, आश्विन ३१-६-८२-३, जडेजा २०-३-४१-३.