भारताची विजयी हॅट्ट्रिक
By Admin | Updated: March 1, 2015 01:09 IST2015-03-01T01:09:13+5:302015-03-01T01:09:13+5:30
शनिवारी कमकुवत संयुक्त अरब अमिरातवर (यूएई) कुठलीही दयामाया न दाखविता नऊ गडी व १८७ चेंडू शिल्लक राखून विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली.

भारताची विजयी हॅट्ट्रिक
यूएईवर नऊ गड्यांनी मात : अश्विनचे चार बळी; रोहितचीही ‘मॅच प्रॅक्टीस’
पर्थ : टीम इंडियाने विश्वचषकाचा विजयी रथ वेगात दौडवित शनिवारी कमकुवत संयुक्त अरब अमिरातवर (यूएई) कुठलीही दयामाया न दाखविता नऊ गडी व १८७ चेंडू शिल्लक राखून विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. सलग तिसऱ्या विजयासह भारताचे सहा गुण झाले. यूएईने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही.
रविचंद्रन अश्विनची गोलंदाजी कारकीर्दीत सर्वोत्तम (२५ धावांत चार बळी) कामगिरी, रोहित शर्मा (नाबाद ५७, ५५ चेंडू, १० चौकार, एक षटकार) तसेच विराट कोहली (नाबाद ३३, ४१ चेंडू ५ चौकार) यांची दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. शिखर धवन १७ चेंडू खेळला. त्याने तीन चौकारांसह १४ धावा केल्या.
यूएईचा कर्णधार मोहम्मद तौकिर याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताच भारतीय गोलंदाजांनी ३१.३ षटकांत १०२ धावांत या नवख्या संघाला गुडघे टेकायला लावले. १८.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात १०४ धावा नोंदवित झटपट विजय साकार केला. चेंडू शिल्लक राखण्याचा हिशेब केल्यास भारताचा हा दुसरा मोठा विजय ठरला. याआधी केनियाविरुद्ध २००१ मध्ये २३१ चेंडू शिल्लक राखून ११.३ षटकांत भारताने दहा गड्यांनी विजय साजरा केला होता.
उभय संघांमधील ही लढत एकतर्फी अशीच होती, पण या सामन्याच्या निमित्ताने रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना सूर गवसला. आधीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. अनुभवी अश्विनने २५ धावांत चार गडी बाद केले. विश्वचषकात भारतीय फिरकीपटूची ही तिसरी सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली. याआधी युवराजने २०११च्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध पाच गडी टिपले होते. २००३ साली युवीने नामिबियाविरुद्ध देखील चार गडी बाद केल्यामुळे पहिल्या दोन स्थानांवर तोच विराजमान आहे.
यूएई संघाने एकवेळ ५२ धावांत सहा गडी गमावले होते. त्यानंतर शेमान अन्वर याने सर्वाधिक ३५ धावा ठोकून संघाला शंभर धावा ओलांडून दिल्या.
भारताने २०१४ साली ढाका येथे बांगला देशला १७.४ षटकांत ५८ धावांत गुंडाळले होते. यूएईची धावसंख्या ही भारताविरुद्ध कुठल्याही संघाने नोंदविलेली दहावी निचांकी धावसंख्या आहे. यूएईचे आठ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. खुर्रम खान याने २८ चेंडूंवर १४ तसेच मंजुला गुरुगे याने १६ चेंडूंवर नाबाद दहा धावा केल्या. शेमानने अखेरच्या गड्यासाठी मंजुलासोबत ३१ धावांची सर्वांत मोठी भागीदारी केली. अश्विनने कृष्ण ४, खुर्रम १४, स्वप्नील पाटील ७ आणि मोहम्मद नबी ६ यांना टिपले. त्याशिवाय रवींद्र जडेजा याने पाच षटकांत २३ धावांत दोन, मोहम्मद शमीचे स्थान घेणाऱ्या वेगवान भुवनेश्वरने पाच षटकांत १९ धावांत एक, उमेश यादवने ६.३ षटकांत १५ धावांत दोन तसेच मोहित शर्माने पाच षटकांत १६ धावा देत एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
४या सामन्याच्या निमित्ताने रोहित शर्माला सूर गवसला. आधीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
४भारताने युएईला
१०२ धावांत गुंडाळले. विरोधी संघाला कमी धावांत गुंडाळण्याचा भारताचा हा वर्ल्डकपमधील विक्रम आहे. यापूर्वी त्यांनी २००३ च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेला १०९ धावांत गुंडाळले होते.
४भारताने आज १८७ चेंडू शिल्लक ठेवून विजय साकारला. यापूर्वी केनियाला २३१ चेंडू शिल्लक ठेवून हरविले होते.
आजच्या लढतीत धावगतीवर लगाम लावणे आवश्यक होते. पहिल्या पाच षटकानंतर विकेट घेण्यावर लक्ष केंद्रित केले. मला सामन्यात पाच बळी घेण्याचा योग साधता आला नाही. संघासाठी मी आकडेवारीला महत्त्व देत नाही.
- रविचंद्रन अश्विन
भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. त्यांनी अचूक मारा केला. आम्हाला २०० पेक्षा अधिक धावा फटकाविणे आवश्यक होते. अश्विनने चांगली गोलंदाजी केली.
- मोहम्मद तौकिर, यूएई कर्णधार
यूएई : अमजद अली झे. धोनी गो. यादव ४, अॅन्ड्री बेरेंगर झे. धोनी गो. यादव ४, कृष्णचंद्रन झे. रैना गो. अश्विन १४, स्वप्निल पाटील झे. धवन गो. अश्विन ७, श्ेमान अन्वर त्रि. गो. यादव ३५, रोहण मुस्तफा पायचित गो. मोहित शर्मा २, अमजद जावेद झे. रैना गो. जडेजा २, मोहम्मद नवीद त्रि. गो. अश्विन ६, मोहम्मद तौकिर त्रि. गो. जडेजा १, मंजुला गुरुगे नाबाद १०, अवांतर : १३, एकूण : ३१.३ षटकांत सर्वबाद १०२ धावा.
गडी बाद क्रम :१/७, २/१३, ३/२८, ४/४१, ५/५२, ६/५२, ७/६१, ८/६८, ९/७१, १०/१०२. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१९-१, उमेश यादव ६.३-२-१५-२, अश्विन १०-१-२५-४, मोहित ५-१-१६-१, जडेजा ५-०-२३-२.
भारत : रोहित शर्मा नाबाद ५७, शिखर धवन झे. मुस्तफा गो. नवीद १४, विराट कोहली नाबाद ३३, अवांतर : ००, एकूण १८.५ षटकांत एक बाद १०४ धावा. गडी बाद क्रम : १/२९. गोलंदाजी : नवीद ५-०-३५-१, मंजुला ६-१-१९-०, अमजद २-०-१२-०, कृष्णा ३-०-१७-०, तौकिर २.५-०-२१-०.