भारतीय संघ गोलंदाजीत दुबळा : श्रीनाथ
By Admin | Updated: February 12, 2015 02:12 IST2015-02-12T02:12:15+5:302015-02-12T02:12:15+5:30
सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे

भारतीय संघ गोलंदाजीत दुबळा : श्रीनाथ
कोलकाता : सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये भारताला जेतेपद मिळवायचे असेल, तर गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे़
सध्या सामनाधिकारी बनलेला श्रीनाथ म्हणाला, की भारतीय संघात सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रम आहे़ फलंदाज कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात़ मात्र, गोलंदाजीत हा संघ कमी पडण्याची शक्यता आहे़ वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांना शंभर टक्के चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे़ तरच जेतेपदाकडे आपण वाटचाल करू शकतो़
वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामना हा फायनलसारखा राहील़ त्यामुळे केवळ फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही, तर गोलंदाजांनीही संघाच्या विजयात हातभार लावायला हवा़ असे झाल्यास भारताला वर्ल्डकप जेता बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही श्रीनाथ याने म्हटले आहे़
पाकविरुद्धच्या सामन्याबद्दल श्रीनाथ म्हणाला, की वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ वरचढ राहिलेला आहे़ या वेळीही टीम इंडिया आपले विजयी अभियान कायम राखेल, असा विश्वास श्रीनाथ याने व्यक्त केला आहे़ (वृत्तसंस्था)