भारताचा ‘विजयोत्सव’

By Admin | Updated: October 23, 2015 01:40 IST2015-10-23T01:40:57+5:302015-10-23T01:40:57+5:30

विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३५ धावांनी पराभव

India's 'Vijayotsav' | भारताचा ‘विजयोत्सव’

भारताचा ‘विजयोत्सव’

चेन्नई : विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या विजयामुळे मुंबईत २५ आॅक्टोबरला रंगणाऱ्या सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरूप आले आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करून ५० षटकांत ८ बाद २९९ फटकावल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला ५० षटकांत ९ बाद २६४ धावा अशी मजल मारता आली. आफ्रिकेची ६ बाद १८५ धावा अशी अवस्था केल्यानंतरही भारताने आपला विजय गृहीत धरला नव्हता. कारण एका बाजूने कर्णधार एबी डिव्हीलियर्स भारताची गोलंदाजी फोडत होता. ९८ चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वर कुमारने ४५व्या षटकात एबीचा अडसर दूर करून निर्णायक कामगिरी केली. एबीने १०७ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची झुंजार खेळी करुन २२वे एकदिवसीय शतक साकारले.
तत्पूर्वी विराट कोहलीचे शतक आणि सध्या फॉर्मशी झगडत असलेल्या सुरेश रैनाची आक्रमक अर्धशतक खेळी या जोरावर भारताने आव्हानात्मक मजल मारली. अखेरच्या षटकांत फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारताला ३०० चा टप्पा पार करण्यात अपयश आले. एकदिवसीय मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यातच संपूर्ण मालिकेत निर्णायक क्षणी नांगी टाकणारी फलंदाजी भारतासाठी डोकेदुखी ठरली होती. टीम इंडियाला सलामीवीर रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, आक्रमणाच्या नादात तो मॉरीसच्या गोलंदाजीवर फाफ डू प्लेसिसकडे झेल देऊन परतला. रोहितने १९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा काढल्या.
शिखर धवन पुन्हा अपयशी ठरल्यानंतर कोहली - रहाणे यांनी १०४ धावांची भागीदारी करून भारताला सावरले. रहाणे ५३ चेंडूत ४ चौकारांसह ४५ धावा काढून बाद झाल्यानंतर कोहली व रैना यांनी हल्ला चढवला. सततच्या अपयशी खेळीने टीका होणाऱ्या रैनाने ५२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा चोपल्या. स्टेनने त्याला बाद केले. दुसऱ्या बाजूला कोहलीचा दांडपट्टा सुरू होता. ११२ चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर तो ६ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने १३८ धावा काढून बाद झाला.
दरम्यान, अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीयांनी हाराकिरी केली. युवा गोलंदाज कागिसो रबाडाने ४९व्या षटकांत कोहली आणि हरभजन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून भारताच्या धावसंख्येला ब्रेक दिला, तर अखेरच्या षटकांत धोनी आणि अक्षर पाठोपाठ बाद झाले. रबाडा आणि डेल स्टेन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. प्लेसिस गो. मॉरीस २१, शिखर धवन झे. डीकॉक गो. रबाडा ७, विराट कोहली झे. डीकॉक गो. रबाड १३८, अजिंक्य रहाणे झे. डीकॉक गो. स्टेन ४५, सुरेश रैना झे. डिव्हीलियर्स गो. स्टेन ५३, महेंद्रसिंग धोनी झे. डिव्हीलियर्स गो. स्टेन १५, हरभजन सिंग त्रि. गो. रबाडा ०, अक्सर पटेल नाबाद ४, भुवनेश्वर कुमार धावबाद (स्टेन) ०. अवांतर - १६. एकूण : ५० षटकांत ८ बाद २९९ धावा.
गोलंदाजी : डेल स्टेन १०-०-६१-३; कागिसो रबाडा १०-०-५४-३; ख्रिस मॉरीस ९-०-५५-१; आॅरोन फांगिसो ९-०-५१-०; इम्रान ताहीर ९-०-५८-०; फरहान बेहारदीन ३-०-१७-०.

दक्षिण आफ्रिका : काँटन्ट डीकॉक झे. रहाणे गो. हरभजन ४३, हाशिम आमला झे. धवन गो. मोहित शर्मा ७, फाफ डू प्लेसिस झे. धोनी गो. पटेल १७, एबी डिव्हीलियर्स झे. धोनी गो. कुमार ११२, डेव्हीड मिल्लर पायचीत गो. हरभजन ६, फरहान बेहारदीन पायचीत गो. मिश्रा २२, ख्रिस मॉरीस धावबाद (रहाणे) ९, अ‍ॅरोन फांगिसो झे. पटेल गो. कुमार २०, डेल स्टेन झे. रहाणे गो. कुमार ६, कागिसो रबाडा नाबाद ८, इम्रान ताहीर नाबाद ४. अवांतर - १०. एकूण : ५० षटकांत ९ बाद २६४ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-६८-३; मोहित शर्मा १०-०-४८-१; हरभजन सिंग १०-०-५०-२; अक्षर पटेल १०-०-४०-१, अमित मिश्रा १०-१-५५-१.

Web Title: India's 'Vijayotsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.