भारताची विजय पंचमी

By Admin | Updated: March 11, 2015 00:47 IST2015-03-11T00:47:46+5:302015-03-11T00:47:46+5:30

आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे.

India's victory is Panchami | भारताची विजय पंचमी

भारताची विजय पंचमी

हॅमिल्टन : आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे. भारताने मंगळवारी आयर्लंडचा ७९ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत ‘ब’ गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. फार्मात आलेल्या गोलंदाजीने आयर्लंडला २५९ च्या माफक धावांवर रोखून विजयाचा पाया रचला होता, त्यावर फलंदाजांनी कळस चढविण्याचे काम केले. सलामीवीर शिखर धवनने ८५ चेंडूत शतक झळकावित विजयात मोलाचा वाटा उचलला.
विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय आहे. आयर्लंड संघाचा पाच सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे, पण बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत हा संघ अद्याप कायम आहे.
आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ‘सेफ गेम’ खेळला. न्यूझीलंडच्या छोट्या मैदानावर भारताला प्रथम फलंदाजी दिली तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागू नये हा त्यामागचा विचार असावा. पण भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियातील कामगिरीचा आलेख न्यूझीलंडमध्येही उंचावताना आयर्लंडचा डाव ४९ षटकांत २५९ धावांत गुंडाळला. गोलंदाजांनी विजय आवाक्यात आणून ठेवल्यावर पुढील सोपस्कार फलंदाजांनी आरामात पूर्ण केले. विजयासाठी आवश्यक धावा ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.
स्टर्लिंग आणि पोर्टरफिल्ड या जोडीने आठव्या षटकात धावसंख्येचे अर्धशतक गाठले होते. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांना प्रथमच सुरुवातीच्या स्पेलमध्ये बळी मिळविण्यात अपयश आले, त्यामुळे चाहत्यांच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली. पण धोनीने खेळपट्टीचा स्वभाव ओळखला आणि नवव्या षटकापासून दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा सुरु केला. धोनीची ही मात्रा लगेच कामी आली. जलदगती गोलंदाजी आरामात खेळणारे न्यूझीलंडचे फलंदाज फिरकीपुढे चाचपडू लागले. रविचंद्रन अश्विनने आपल्या दुसऱ्याच षटकांत भारताला पहिले यश मिळवून दिले. फिरकीचा दबाव झुगारण्यासाठी अश्विनला पुढे येवून षटकार ठोकण्याचा प्रयत्न स्टर्लिंगच्या अंगलट आला आणि त्याने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला. पोर्टरफिल्डला मग साथ देण्यास नील ओब्रायन आला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असताना मोहीत शर्माने पोर्टरफिल्डचे काम तमाम केले. या विकेटसने भारताचा जीव भांड्यात पडला असे वाटत असताना नील ओब्रायन व अँडी बालबिर्नी (२४) यांनी पाचव्या विकेटसाठी ७.४ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला. भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत ६.३ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आयर्लंडतर्फे कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड (६७) व नील ओब्रायन (७५) यांनी अर्धशतके झळकावली.
रविचंद्रन अश्विनने ३८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर मोहम्मद शमीने ४१ धावांत ३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली. उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
अशा खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचे प्रात्यक्षिक भारतीय फलंदाजांनी आज आयरिश फलंदाजांना दिले. प्रत्युत्तरात खेळताना धवनने ८५ चेंडूंना सामोरे जात १०० धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत (६४) सलामीला १७४ धावांची भागीदारी करीत विजयाचा पाय रचला. त्यानंतर विराट कोहली (नाबाद ४४) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद ३३) यांनी संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. भारताने ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. भारताला यानंतर १४ मार्च रोजी आॅकलंड येथे साखळीतील अखेरच्या सामन्यांत झिम्बाब्वेविरुद्ध खेळावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India's victory is Panchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.