दक्षिण आफ्रिकेवर भारताचा विजय
By Admin | Updated: December 1, 2014 01:45 IST2014-12-01T01:41:13+5:302014-12-01T01:45:53+5:30
स्मृती मंधानाचे (५२) शानदार अर्धशतक आणि पूनम यादवची (३ बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात

दक्षिण आफ्रिकेवर भारताचा विजय
बंगलोर : स्मृती मंधानाचे (५२) शानदार अर्धशतक आणि पूनम यादवची (३ बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात १६ धावांनी शानदार विजय मिळविला़ एम़ चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली़ प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका महिला संघ निर्धारित षटकांत ९ बाद १३० धावा करू शकला़
भारताची सलामीवीर खेळाडू वेलास्वामी वनिता (७) ही लवकरच तंबूत परतली;मात्र यानंतर मिताली राज (४०) हिने एका बाजूने संयमी फलंदाजी केली़ तिने आपल्या खेळीत ३१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि २ षटकार लगावले़
वनिता बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या स्मृती मंधाना (५२) हिने शिखा पांडेसह (२३) चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करीत डाव सांभाळला़ स्मृतीने ४२ चेंडूंत ५ चौकार लगावले, तर शिखाने १८ चेंडूंत १ चौकार आणि १ षटकार खेचला़ दक्षिण आफ्रिकेकडून सुनेटे लाबसर हिने २९ धावांत २ विकेट मिळविल्या़ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली; मात्र मिताली राज हिने सलामीवीर खेळाडू डेन वॉन निकर्क (४६) हिला धावबाद केले़ त्यानंतर नियमित अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले़ अखेर हा संघ निर्धारित षटकांत ९ बाद १३० धावांपर्यंत मजल मारू शकला़ आफ्रिकेच्या मारिजेन केंप हिने ३३ धावांची खेळी केली़ भारताकडून पूनम यादव हिने ३, तर एकता बिष्टने २ विकेट मिळविल्या़ (वृत्तसंस्था)